रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सरत्या आर्थिक वर्षामध्ये ९४.६४ कोटी रुपयांचा ऐतिहासिक ढोबळ नफा झाला आहे. बँकेच्या ठेवी २८६६.८७ कोटी रुपये, कर्जव्यवहार २१९९.६३ कोटी असा ५०६६.५१ कोटी एकूण व्यवसाय झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषदेत डॉ. चोरगे यांनी बँकेचा लेखाजोखा सादर केला. बँकेचे कार्यक्षेत्र रत्नागिरी जिल्हा असून ९ तालुक्यांत ७६ शाखा, प्रधान कार्यालय असे विस्तारलेले आहे. २८ शाखा स्वमालकीच्या जागेमध्ये बँकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण भागांतील सर्वाना सुविधा देत आहेत. डॉ. चोरगे म्हणाले की, बँकेच्या गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये २३०.७० कोटीने, कर्जव्यवहारात १९५.३४ कोटीने वाढ झाली आहे. बँकेच्या व्यवसायामध्ये ४२६.०४ कोटीने वाढ झाली. तसेच ढोबळ नफ्यामध्ये २६.११ कोटीने वाढ झाली आहे.
बँकेचा ढोबळ एनपीए २.९१ टक्के असून नक्त एनपीए ०.०० टक्के एवढा आहे. सलग १३ वर्षे हा एनपीए ०.०० टक्के असून सलग १४ वर्षे बँकेने अ ऑडिट वर्ग प्राप्त केला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शेती सहकारी संस्थांना रु. ५.०० लाख कमाल मर्यादिपर्यंत संस्था कार्यालय इमारत बांधकामाकरीता आर्थिक मदत देणेत येते. बँकेतर्फे १०० संगणक संच जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळांना देणेचे आश्वासन देणेत आले होते. त्यानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५० संगणक संच जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करणेत आले आहेत. तसेच उर्वरित ५० संगणक संच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सुपूर्द करण्यात आले आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून बँकेने आपत्ती, उत्कृष्ट खेळाडू, अनाथ आश्रम, दिव्यांग मुलांचे वसतीगृह, शेतकरी कार्यशाळा आदी कारणांसाठी ५५.८५ लाख रुपये मदत केली आहे.
मुदतीत पूर्णफड करणाऱ्या प्राथमिक शेती सहकारी संस्थांना व थेट कर्जदारांना त्यांनी आर्थिक वर्षात एकूण दिलेल्या व्याजाच्या रक्कमेत ०.५० टक्के सवलत देण्यात आली आहे. बँकेला सरत्या आर्थिक वर्षात लोकसत्ता संघर्ष सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थविश्व पुरस्कार व भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचा बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ दि इयर अॅवॉर्डने गौरवण्यात आले. बँकेने ग्राहकांसाठी जिल्ह्यात १९ ठिकाणी ATM सेंटर कार्यान्वित केली असून, त्याद्वारे ग्राहकांना पैसे काढणे, बॅलन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट जनरेट करणे इ. सुविधा देणेत येत आहेत. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, ज्येष्ठ संचालक अॅड. दीपक पटवर्धन, रमेश कीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, राजेंद्र सुर्वे, म. शं. टिळेकर आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.