दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. भारतामध्ये अगदी लहानातील लहान खेड्यात सुद्धा दिवाळी उत्साह पूर्ण वातावरणामध्ये साजरी केली जाते. दिवाळी हा सण सर्व धर्मीयांमध्ये साजरा केला जातो. दिवाळीच्या फराळापासून ते रोषणाई पर्यंत सगळ्या गोष्टी करण्यात मोठ्यापासून लहानग्यांचा उत्साह दांडगा असतो.
वसुबारस, धनत्रयोदशी, दिवाळी अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज या उत्साही दिवसांची मजा काही औरच असते. दिवाळीच्या काळामध्ये बाजारपेठेमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या सामानाची रेलचेल दिसून येते. कोणत्या प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध नाही असे होत नाही.
बाजारपेठेमध्येसुद्धा विविध प्रकारची लायटिंग, आकाश कंदील, विविध रूपातील फटाके, फराळाची दुकाने, रांगोळ्यांची विविध दुकाने, पणत्या, गालिचे, विविध प्रकारचे आकर्षक कपडे, ज्या ज्या प्रकारे दिवाळी आनंदाने साजरी केली करता येईल अशी सर्व साधने दुकानामध्ये व्यापारी उपलब्ध करून देतात.
दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या गोड पदार्थ, मिठायांचे देवघेव केली जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने प्रकाशमान करून टाकतात. दिवाळीला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावण्याची प्रथा आहे. अंगणात मुख्य प्रवेशद्वारासमोर विविध रंगांच्या रांगोळ्या काढून सुशोभिकरण केले जाते. पाहुण्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत आदरातिथ्य केले जाते. असे म्हणतात कि, रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते. त्याबरोबर घरात चारही बाजूंना दिव्यांची आरास करून, घर सजवले जाते. या दिवसामध्ये विविध प्रकारचे सेल जाहीर केले जातात त्यामुळे बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.
लोक एकमेकांना शुभेच्छा देवून आणि उपहार व दिवाळीचे मिष्ठान्न देवून आपले नाते अधिक बळकट बनवतात. त्याचप्रमाणे सध्या इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचा ट्रेंड असल्याने, सर्व देशवासी पर्यावरणाला होत असलेल्या नुकसानाबाबत जागृत राहून, त्याला कुठेही नुकसान पोहोचणार नाही याचा विचार लक्षात घेऊन प्रदूषण रहित दिवाळी साजरी करतात. शाळा आणि इतर संस्थांमध्ये तसेच भारत सरकारही नागरिकांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची विनंती करतात.