लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडत असून तब्बल ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्याहस्ते झालं. यावेळी, पंतप्रधानांनी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्न असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाचे स्वागत केले. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. तर, राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी आवर्जून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांच्या प्रगतीसाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचं म्हटलं. यावेळी, भाषण करताना नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या सर्व बंधु-भगिनींना माझा नमस्कार म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. येथील ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होत आहे.
मुंबईला अधिक गतीमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे, असे मोदींनी म्हटले. महाराष्ट्राजवळ गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्रात सशक्त वर्तम ान आहे, आणि महाराष्ट्राजवळ समृद्ध विकासाचे स्वप्न आहे. महाराष्ट्राचा विकसित भारतात मोठा वाटा आहे, महाराष्ट्रात उद्योग, शेती, फायनान्स सेक्टरची पॉवर आहे. म्हणून मुंबई ही पॉवर हब आहे, महाराष्ट्राला जगाचे सर्वात मोठे आर्थिक पॉवर हाऊस तयार करायचे आहे, मुंबईला जगाचे फिनटेक कॅपिटल करण्याचे माझे स्वप्न आहे, असे म्हणत मोदींनी मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचे स्वप्न बाळगल्याचे म्हटले.