नाताळच्या सुटयांमुळे कोकणात पर्यटकांचा ओघ वाढला असून, समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे, मात्र पर्यटकांचा अतिउत्साह जीवावर बेतणारा ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक पर्यटक चारचाकी किंवा दुचाकी वाहने समुद्र किनाऱ्यावर पाण्यात घेऊन जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी हर्णे येथे पर्यटकांची गाडी पाण्यात रुतल्याचे प्रकार घडले होते. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. सलग सुट्यांमुळे मुंबई-पुण्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांची पावले गोव्यासह कोकणातील किनाऱ्यांकडे वळलेली आहे. गुरुवारी (ता. २५) गणपतीपुळे, गुहागर, दापोली येथील किनारी परिसरात मोठ्याप्रमाणात गर्दी होती. आज पर्यटकांचा ओघ थोडा कमी झाला आहे. मात्र प्रसिद्ध किनाऱ्यांवर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. फिरायला आलेले पर्यटक जलक्रीडांसह समुद्रस्नानाला प्राधान्य देतात. गेल्या चार दिवसात समुद्र शांत आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांचा धीर चेपला असून ओहोटीवेळी मोकळ्या किनारी भागात चारचाकी वाहने फिरवताना दिसतात.
हे चित्र ज्या किनारी भागात पर्यटकांचा राबता कमी असतो, तिथे अधिक पाहायला मिळते. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे-काजीरभाटी येथील किनाऱ्यावर पर्यटकांचा राबता कमी असतो. हा किनारा पूर्ण मोकळा असल्यामुळे गुरुवारी (ता. २६) सायंकाळी सुमारे दहा ते बारा पर्यटक वाहने समुद्रकिनाऱ्यावर घेऊन गेलेले होते. त्यांना हटकण्यासाठी तिथे कोणीच नव्हते. एका चालकाने तर थेट पाण्यातच गाडी चालविण्याचा प्रताप केला होता. हा अतिउत्साह पर्यटकांच्या जावावर बेतणारा ठरू शकतो. वाळूत गाडी रूतल्यानंतर, ती बाहेर काढण्यासाठी मोठा त्रास होतो. त्यात गाडीचे नुकसान होण्याची शक्यता असते. दापोली तालुक्यात गेल्या दोन महिन्यात अशा तीन घटना घडल्या होत्या. या घटनांची पुनरावृत्ती अन्यत्रही होऊ शकते. त्यामुळे प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे दापोलीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नाताळच्या सुटीमुळे पर्यटक मोठ्यासंख्येने दापोलीकडे येत आहेत. दापोली एसटी स्टँड ते मच्छीमार्केट परिसरात वाहनचालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत होती.
महामार्गावर वाहतूक कोंडी – मुंबई-गोवा महामार्गावर रायगडपासून ते गोव्यापर्यंत ठिकठिकाणी वाहनांची कोंडी होत आहे. रायगडमधील इंदापूर आणि माणगाव परिसरापासून वाहतूक कोंडीला सुरुवात होते. माणगावजवळ कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रवाशांनी माणगाव दिघी रोडवरील माणगाव बसस्थानकाकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्या पर्यायी मार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. तिच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यात चौपदरीकरणाची कामे सुरू असलेल्या आरवली, संगमेश्वर, निवळी परिसरातही पाहायला मिळत आहे.