अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आधारे देखरेख व डिजिटल डाटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवण्यास आजपासून सुरुवात झाली. परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलदी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारीवर आता रोख लागणार आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथील आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचे आज उद्घाटन करण्यात आले. रत्नागिरीमधील भाट्ये व मिरकरवाडा ठिकाणांवरून ड्रोनद्वारे देखरेख होणार आहे. येथील भाट्ये समुद्रकिनारी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ड्रोन समुद्रावर झेपावला. याप्रसंगी मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त आनंद पालव उपस्थित होते. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले होते. आज सुरू झालेल्या प्रणालीमुळे सागरी सुरक्षा बळकट होण्यास मदत होणार आहे. गस्तीनौकेद्वारे समुद्रामध्ये गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही.
अनधिकृत नौकांचा पाठलाग करत असताना त्या पळून जात असतात. अशा वेळेस गस्ती नौकेसह राज्याच्या जलदी क्षेत्रामध्ये ड्रोनच्या वापरामुळे योग्य नियंत्रण राखण्यासाठी व कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यास मदत होईल. ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिक क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येईल. ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकांची मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभाग सुलभरीत्या उपलब्ध होऊ शकेल. ड्रोन हे सागरी पोलिस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहे. एक दिवसामध्ये (२४ तासांच्या कालावधीत) १२० सागरी मैलाचे सर्वेक्षण करण्यात येईल. ड्रोनच्या उड्डाणानंतर प्राप्त झालेली माहिती (रेकॉडेड डाटा) संबंधित जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिली जाईल. तसेच सर्वेक्षण हे कंट्रोल रूमपर्यंत वेब स्ट्रिमिंगद्वारे पुरवण्यात येईल. घुसखोरी करून मासेमारी करणाऱ्या मलपी नौका ताब्यात घेणाऱ्या मत्स्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावर होणार कारवाई – ट्रॉलर नेटद्वारे मासेमारी, पर्ससीन पद्धतीने मासेमारी, गिलनेट पद्धतीने मासेमारी, एलइडी/डायनामाईट/रसायने वापरून करण्यात येणारी अवैध पद्धतीची मासेमारी, नोंदणीकृत नौका क्रमांक, नाव व जिल्ह्याचा कलरकोड यांची नोंद नसलेल्या मासेमारी नौका, पावसाळी बंदीच्या काळात अवैधरित्या मासेमारी करण्याऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.