गोव्यातील दूधसागर धबधब्यामुळे गोव्याच्या सृष्टी सौंदर्यात भर पडली आहे. अनेक पर्यटक पावसाळ्यामध्ये तेथील अवर्णनीय सृष्टी सौंदर्य अनुभवण्यासाठी विशेष तिथे भेट देतात. रेल्वे प्रवासातून तर त्याचे दुधासारखे फेसाळलेले रूप डोळ्याचे पारणे फेडणारे असते. अनेक वेळा पर्यटकांच्या अताताईपणामुळे दुर्घटना घडतात.
गोव्यातील दूधसागर धबधब्याजवळ बांधलेला छोटा पूल मुसळधार पावसामुळे कोसळला. पावसामुळे मांडवी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे ४० पर्यटक तेथे अडकले, मात्र तेथे उपस्थित जीवरक्षक जवानांनी त्यांना वाचवले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही बचाव करणाऱ्या जीवरक्षकांचे कौतुक केले.
मांडवी नदी पश्चिम घाटातून पणजीकडे वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. मांडवी नदीच्या या प्रवासात दूधसागर फॉल्स हा एक छोटासा ब्रेक आहे. हा भारतातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. दूध सागर धबधब्याची एकूण उंची ३०० मीटर किंवा १००० फुटांपेक्षा थोडी जास्त आहे.
गोवा-कर्नाटक सीमेवरील नयनरम्य दूधसागर धबधबा मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतो. पावसाळ्याच्या सुरुवातीस त्याचा प्रवास थांबवण्यात आला होता, परंतु या आठवड्याच्या सुरुवातीला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. गोव्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
मात्र, दूधसागर येथे तैनात असलेल्या दृष्टी जीवरक्षकांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे पुढचे काही दिवस दूधसागर धबधब्याकडे न जाण्याचा इशारा दृष्टी मरीनने दिला आहे. तरी देखील काही अति उत्साही पर्यटकांमुळे अशा दुर्घटना घडतात.