मुसळधार पावसाचा जोर सलग दुसऱ्या दिवशी कायम आहे. पावसाबरोबर वेगवान वारे वाहत असल्यामुळे मच्छीमारीला ठप्प झाली आहे. अनेक मच्छीमारी नौकांनी दुसऱ्या दिवशीर हर्णै, मिरकरवाडा, नाट्ये, जयगड, किनाऱ्याचा आसरा घेतला. गेल्या २४ तासात सर्वांत जास्त २४५ मिमी पाऊस दापोली तालुक्यात झाला. तर खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी गाठली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दहीकालाच्या मुहुर्तावर कमबॅक केले आहे. कालपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. आज सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली. दुपारनंतर सरीवर पाऊस सुरू झाला. मात्र या पावसाने भात पिकाला मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकरी राजाची देखील चिंता कमी केली आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता मोठी पडझड झाल्याची नोंद नाही. जिल्ह्यात सरासरी १२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये मंडणगड ८०, दापोली २४५, खेड ५६, गुहागर १७०, चिपळूण १६१, संगमेश्वर ९३, रत्नागिरी १८०, लांजा १०४, राजापूर ६५ मिमी नोंद झाली. या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी वर वहायला सुरुवात केली. आज दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. या पावसामुळे भात शेतीला संजीवनी मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कातळावरील सुमारे १२००० हेक्टर क्षेत्र राहिले आहे. हा पाऊस पुढे चार दिवस तरी पडत राहावा अन्यथा कातळावरील शेतीला धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.