25.7 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeRatnagiriडॉक्टरांअभावी आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट तब्बल ६६ पदे रिक्त

डॉक्टरांअभावी आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट तब्बल ६६ पदे रिक्त

कर्मचाऱ्यांची रिक्त पदांमुळेही कामे खोळंबण्याचे प्रमाण वाढले आहे.

गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये मिळून तब्बल ६६ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. नर्सिंग, कार्यालयीन वर्ग ३, वर्ग ड ची जवळपास पावणेतीनशे पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांना अन्य जिल्ह्यात औषध उपचारासाठी पाठवण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढले असल्याने सण व नातेवाईकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे.मागील अनेक वर्षापासून रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांना डॉक्टरांचा प्रश्न भेडसावत आहेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची रिक्त पदांमुळेही कामे खोळंबण्याचे प्रमाण वाढले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात ३० पैकी ११ डॉक्टरांची पदे रिक्त असून यात जिल्हा रुग्णालयात तीन मंजूर पदांपैकी एकही बालरुग्ण नाही. त्यामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांचीही तीन पैकी दोन पदे रिक्त आहेत. भूलतज्ज्ञ १ असून क्ष किरण तज्ज्ञांचे पदही रिक्त आहे. जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांची स्थिती बिकट असून ९१ पैकी ४४ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. पाली येथील ग्रामीण रुग्णालयात मंजूर असलेली तीनही डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्याठिकाणाहून रुग्णांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचे काम कर्मचारी करतात.

गट ड अंतर्गत येणाऱ्या ३२ प्रकारची २८३ पदे मंजूर असून त्यातील १३४ पदे रिक्त आहेत. जवळपास निम्मी पदे रिक्त असल्याने त्याचाही परिणाम कामकाजावर होत आहे. जिल्ह्यात नर्सिंग कर्मचाऱ्यांची स्थिती बरी असली तरी रिक्तपदेही भरण्याची मागणी होत आहे. जिल्हा रुग्णालयात १३१ पदे मंजूर असून त्यातील ३२ पदे रिक्त आहेत. तर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये मिळून २५८ नर्सिंगची पदे मंजूर असून त्यातील ५७ पदे रिक्त आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular