कोकणात रिफायनरीचा विषय आला त्या वेळी या परिसरातील खोदचित्रांची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यांनी हा विषय उचलून धरला व हा वारसा जपला पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली. यामुळे खोदचित्रांचा विषय अग्रस्थानी आला आहे, असे प्रतिपादन बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापिठाचे पुरातत्त्व विभाग व प्राचीन इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. व्ही. एच. सोनावणे यांनी केले. डॉ. बा. ना. सावंत रोडवर राधाकृष्ण थिएटरच्या समोर टुमदार कौलारू घरामध्ये खोदचित्र केंद्र सुरू झाले आहे. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, “कोकणात आढळलेली कातळशिल्पे ही भूमी खोदचित्रे आहेत. आज खोदचित्र आणि वारसा संशोधन केंद्रही सुरू होत आहे, ही सर्वांत मोठी घटना म्हणावी लागेल. पुरातत्त्वीयदृष्ट्या ही खोदचित्रे अत्यंत महत्त्वाची आहेत” गेल्या तीन महिन्यांत कातळशिल्पांच्या संदर्भाने कशा प्रकारे संशोधनाचे कार्य सुरू झाले आहे याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. सोनावणे म्हणाले, रिफायनरीविषयी मला जास्त माहिती नाही; परंतु बारसूमध्ये रिफायनरीचा विषय आला त्या वेळी कातळशिल्पांचा विषय प्रामुख्याने चर्चेत आला. त्या वेळी कातळशिल्पांबाबत लोकांना आवड वाटू लागली.
यावर मी राजकीय भाष्य करणार नाही; पण कातळशिल्पांना संरक्षण दिले पाहिजे, हा विषय पुढे आला. या निमित्ताने कातळशिल्पांचे जतन होण्यासाठी सकारात्मक पावले पडत आहेत. डॉ. अरुण मेमन म्हणाले, संशोधन केंद्र सुरू होणे ही महत्त्वाची गोष्ट होती. जनतेला या केंद्रात कातळशिल्प संशोधनाची माहिती मिळेल. सर्वांच्या प्रयत्नांतून काम होणार असून कोकणचा इतिहास समोर येईल. कातळशिल्प हे समाजाचे प्रतिबिंब आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. श्री प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प असून, काही ठराविक प्रकल्पांनाच संशोधन केंद्र मंजूर होते. विज्ञान, संस्कृती, इतिहास या अनुषंगाने संशोधन केले जाणार आहे. शाश्वत पर्यटनासाठी हा प्रकल्प फायदेशीर आहे.