पर्यावरण पूरक गणेश मूर्ती म्हणून शाडू मातीच्या मूर्ती आणि कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तीना पसंती वाढत असताना गायीच्या शेणापासून पूर्णतः पर्यावरण पूरक मूर्तीचा पर्याय दिला आहे तो हरचेरी येथील दीपाली प्रणीत यांनी. दीपाली ह्या खरंतर पेशाने वकील तर त्यांचे पती प्रणीत हे पेशाने इंजिनियर. मुंबईतील वास्तव्य आणि व्यवसाय सोडून निसर्गाच्या सानिध्यात रहाण्याच्या उद्देशाने कोरोना काळात त्यांनी हरचेरी गावात २४ एकर जम ीन कराराने घातली आणि पर्यावरण प्रेमी असलेल्या ह्या दांपत्याने हॅपी ईको व्हीलेज ही संकल्पना येथे सहा वर्षांपूर्वीपासून राबवण्यास सुरुवात केली. सेंद्रिय शेती, गोपालन, काळी हळद लागवड असे विविध उपक्रम हे दांपत्य राबवत आहेत. ह्याच दरम्यान केवळ देशी गायींची गोशाळा विकसित करताना दुग्धजन्य पदार्थावर लक्ष केंद्रीत करत असताना शेणापासून गणेश मूर्ती तयार करण्याची कल्पना दीपाली आणि प्रणीत यांच्या मनात आली.
अर्थात शेणापासून देवाच्या मूर्ती करायच्या असल्यामुळे त्यांनी सर्वात आधी त्याबद्दल माहिती घेतली. तेव्हा शास्त्रातही देशी गायींचे शेण हे पवित्र असल्याचे उल्लेख त्यांना सापडले आणि त्यानंतरच त्यांनी ह्या मूर्ती करण्याचा निर्णय घेतला. शाडू मातीच्या आणि कागदापासून तयार केलेल्या मूर्ती ह्या पुर्णपणे पर्यावरण पूरक नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. शाडू माती ही विरघळत असली तरी ती झाडाच्या वाढीसाठी उपयुक्त नाही. तसेच कालांतराने ती माती कडक होत असल्याने तिचा कोणताही उपयोग होत नाही. त्याच प्रमाणे कागदी मूर्ती ह्या विघटित होत असल्या तरी कागदाचे तुकडे पाण्यात विरघळत नसल्यामुळे पाण्यात माशांना त्याचा त्रास होतो.
ह्या पार्श्वभूमीवर शेण हे सर्वार्थाने पर्यावरण पूरक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ह्यासाठी देशी गायींचे शेण आणि शेतातील स्थानिक लाल माती एकत्र करून ह्या मूर्ती तयार केल्या जातात. शेण हे पुर्णपणे पाण्यात विरघळत असल्यामुळे आणि अशा पाण्याचा उपयोग झाडांसाठी आणि अशा मुर्त्या बनवण्याचा ध्यास दीपाली आणि प्रणीत यांनी घेतला. ह्यासाठी ते फेब्रुवारी महिन्यापासून गणेश मूर्ती तयार करण्यास प्रारंभ करतात. एप्रिल मे महिन्यांपर्यंत मूर्ती तयार करून त्या उन्हात सुकवल्या जातात. त्यानंतर त्यांना रंग दिला जातो. काही मूर्ती ह्या न रंगवता शेणाच्या नैसर्गिक रंगातच विकल्या जातात. गेल्या वर्षी त्यांनी अशा सुमारे १०० मूर्ती तयार केल्या. एक फुट ते तीन फुटांच्या त्या मूर्तीना परिसरातून मोठी मागणी निर्माण झाली. यंदा सहा इंच ते तीन फुट अशा ३०० मूर्ती दीपाली आणि प्रणीत यांनी काढल्या आहेत. सातशे रुपयांपासून ते साडेचार हजारांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. ह्या मूर्तीना मुंबईत आणि पुण्यातही मागणी आहे.