महाराष्ट्रातील वारसा असलेल्या आठ बारव अर्थात हेरिटेज स्टेपवेल्सची पोस्टकार्डस् आणि माहितीपुस्तिका पोस्टाने प्रकाशित केली आहे. राष्ट्रीय टपालदिनानिमित्त नुकतेच त्यांचे प्रकाशन झाले. मुख्य पोस्टमास्तर जनरल के. के. शर्मा (महाराष्ट्र सर्कल) आणि पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग यांच्यातर्फे महाराष्ट्र पोस्टल सर्कलद्वारे हे जारी करण्यात आले. स्टेपवेल म्हणजे अशी विहीर किंवा पाण्याची टाकी ज्यात पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात स्टेपवेल्सना बारव, बावडी, पुष्करिणी, पोखरण, पायविहीर, घोडेबाव, पोखरबाव अशी वेगवेगळी नावं आहेत.
सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव आणि नंतर शिवकालीन युगातील राजे किंवा श्रीमंत व्यक्तींनी, अनेक सत्ताधारी घराण्यांनी या पायऱ्यांच्या विहिरी बांधल्या होत्या. यापैकी काही स्टेपवेल्सवर शिलालेख कोरलेले आहेत. त्यावरून त्यांचा काळ आणि इतिहास कळू शकेल. त्यांपैकी अनेक कोरीव कामे आणि देवकोष्टाने वास्तुशास्त्रीयदृष्ट्या भव्य आहेत. महाराष्ट्र बारव मोहिमेंतर्गत लोकसहभागातून महाराष्ट्रातील दोन हजार स्टेपवेल्सची अचूक ठिकाणे यशस्वीरित्या मॅप केली आहेत आणि त्यांची माहिती www. indianstepwells.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
त्या हेलिकल, एल आकार, झेड आकार, शिवपिंडी आकार, चौकोनी / आयताकृती आकार अशा विविध वास्तू स्वरूपातील आहेत; परंतु त्यांचे आकार, वापरलेली सामग्री आणि पाण्याची साठवण क्षमता भिन्न आहे. या पुस्तिकांसाठी बारवांचे फोटो, माहिती महाराष्ट्र बारव मोहिमेचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे यांनी दिली आहे. “आम्ही महाराष्ट्र टपालखात्याचे आभारी आहोत. या उपक्रमामुळे लोकसहभागातून स्टेपवेल्सचे जतन, संवर्धन आणि पुनरूज्जीवनाच्या प्रयत्नांना आणि पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.