कोकणात माकड आणि वानर हे दोन प्राणी नसले तर कोकण समृद्ध होईल. गेली कित्येक वर्षे न मारल्यामुळे त्यांची संख्या शंभरपटीने वाढली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वानर आणि माकडे यांना उपद्रवी पशू जाहीर करून मारायला सुरुवात केली आहे. मारण्यासाठी अनुदान देणे सुरू केले. महाराष्ट्रातसुद्धा असे करण्याची गरज आहे; अन्यथा भविष्यात कोकणातील शेतकरी आत्महत्या करू लागला तर आश्चर्य वाटायला नको, असा इशारा गोळप येथील सामाजिक कार्यकर्ते व आंबा बागायतदार अविनाश काळे यांनी निवेदनाद्वारे मांडली आहे.
ग्रामीण भागात नागरिक कष्ट करून स्वर्ग निर्माण करतील. आज लाखो रुपयांचे कष्ट पाण्यात जात आहेत. याकरिता शासनाने वानर व माकडे यांना उपद्रवी पशू म्हणून जाहीर करावे. तसे केले नाही तर उपोषणाला बसल्याशिवाय गत्यंतर उरणार नाही, असे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. आंबा राखणीसाठी आज लाखो रुपये खर्च होत आहेत. केळी, भाजीपाला, नारळ, फळभाज्या, फणस, चिकू, पेरू, पपई, शेवगा, कुळीथ, उडीद आदींचे लाखो रुपयांचे उत्पन्न ही जोडी आणि त्यांची प्रचंड वाढलेली जमात फस्त करतेय. शिवाय नळे, कौले, छप्पराचे पत्रे फोडणे यांचे नुकसान वेगळे.
माकडे तर घरात घुसून नासधूस करायला लागली आहेत. अंगावर येण्याचे धैर्य त्यांच्याकडे वाढत चालले आहे. आर्थिक नुकसान, हाकलण्याचे शारीरिक नुकसान, होणाऱ्या वेदना, हतबलता आणि मानसिक नुकसान… किती सोसायचे? याबाबत मी पंतप्रधान कार्यालयाकडे मांडले होते. त्या वेळी वनाधिकारी माझ्याकडे येऊन नुकसान भरपाईबाबतचा जीआर देऊन गेले. त्यात प्रचंड त्रुटी आहेत. हे त्यांनाही माहीत आहे. पंचनामा, त्यावरील सह्या, खाल्लेले नुकसान कसे दाखवणार? राखण करण्यासाठी होणारा त्रास, नळे, पत्रे फोडलेले इ. बाबत भीक नको; पण कुत्रा आवर, अशी स्थिती आहे.