गावाचा खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीला अनन्य साधारण अधिकार शासनाने दिले आहेत. त्यामुळे सर्वांनीच राजकीय मतभेद दूर ठेवून गावाचा विकास साधला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे केले. जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन कक्ष, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद यांनी आज स्वा. वि. दा. सावरकर नाटयगृह, मारुती मंदीर येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा पुरस्कार व जिल्हा परिषद आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचें आयोजन केले होते. यावेळी मंत्रीमहोदयांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले, त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, सहाय्यक प्रकल्प संचालक संतोष गमरे व जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले,सरंपच आणि ग्रामसेवक ही गाडीची दोन चाके आहेत, ही विश्वासाने व समन्वयाने चालली पाहिजेत. दोघांनी एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत, गावाचा खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी ग्राम पंचायतीला अनन्यसाधारण अधिकार शासनाने दिले आहेत.

सन २०२०-२१ व सन २०२१-२२ अंतर्गत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार संगमेश्वरमधील कोंड असुर्डे ग्रामपंचायतील देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय क्रमांक गुहागरमधील खामशेत ग्रामपंचायत आणि तृतीय क्रमांक चिपळूणमधील मरवणे ग्रामपंचायतीने पटकावला आहे. त्यांचाही पालकमंत्री उदय सामंत आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच वर्षातील विशेष पुरस्कार स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी व्यवस्थापन) रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) राजापूर तालुक्यातील अणसुरे, तर स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार ( शौचालय व्यवस्थापन) संगमेश्वरम धील सांगवे या ग्रामपंचयातीला देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हयामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचाही आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.