बारसू -सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाची माती सर्वेक्षण करण्यासाठी तालुका प्रशासनाने रिफायनरी प्रकल्प परिसरात मनाई आदेश लागू करुन रिफायनरी विरोधी आंदोलक नेत्यांना तालुका, जिल्हा बंदी नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाचा मनाई आदेश धुडकावत सोमवारी सकाळपासून शेतकऱ्यांनी कपडालत्ता, जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊन बारसू सड्यावर ठाण मांडले. सोमवारी दुपारनंतर उपविभागीय अधिकारी वैशाली माने, तहसीलदार शितल जाधव यांनी आंदोलक शेतकरी यांच्याशी चर्चा केली. रिफायनरी आंदोलकांनी बारसूच नव्हे तर कोकणात रिफायनरी प्रकल्प करण्यास आपला विरोध आहे. आंदोलकांना तडीपारच्या बजावलेल्या नोटीसा, मनाई आदेश आणि माती सर्वेक्षण काम थांबवावे तर आमचे आंदोलन मागे घेऊ, असे प्रशासनाला सांगितले होते. आंदोलकांशी झालेली चर्चा निष्फळ ठरली.

रात्र सड्यावर जागवली – बारसू रिफायनरी प्रकल्प ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी सोमवारपासून हजारो महिलांनी बारसू सड्यावर ठाण मांडून राहिल्या. आपल्यासोबत आणलेला शिधा खाऊन सड्यावर मुक्काम केला. मिळेल तेथे बसून तर काहींनी डुलकी घेत सोमवारची रात्र सड्यावर जागवून काढली. यामध्ये महिला, वयोवृद्ध महिलांचा समावेश होता. रिफायनरी रद्द करण्याचा निर्धार करूनच महिला आंदोलनात उतरल्या आहेत.

पोलिसांचा ताफा अडवला – माती सर्वेक्षण करण्यासाठी पोलिस संरक्षणात अधिकारी सकाळी ८.३० वा.च्या दरम्यान पोलीस ताफा बारसू सड्यावर जात असताना तेथे हजर असलेल्या महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांचा ताफा अडवला. पोलिसांची गाडी वळण घेत असताना महिलांची धावपळ झाली. मात्र, पोलीस गाडी वळवत असल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा महिलांनी रस्त्यावर ठाण मांडले.

रिफायनरी रद्दचा नारा – आंदोलनकर्त्यां महिलांशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधून आंदोलन का करता? असा प्रश्न विचारला असता एका महिलेची बोलकी प्रतिक्रिया पुढे आली. या जागेत राबून आमची पोरं सांभाळली. त्यांना मारून रिफायनरी आम्हाला नको. ‘एकच जिद्द, रिफायनरी रद्द!’ अशी घोषणा देऊन रिफायनरी सर्वे क्षण थांबवले जात नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही, असे महिलेने ठामपणे सांगितले.

कारवाईची तमा नाही – प्रशासनाचामनाई आदेश धुडकावून बारसू सोलगाव येथील शेतकरी महिलांनी रिफायनरी माती सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी बारसू सड्यावर पोलिसांचा ताफा अडवण्यासाठी रस्त्यावर झोपलेल्या महिला आंदोलकांनी बोलताना सांगितले की, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली तरी त्याची तमा आम्ही बाळगत नाही. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करुन २५ महिलांना ताब्यात घेऊन राजापूरला रवाना केले. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे समजते.

 पत्रकारांना अटकाव – आंदोलनकर्त्यां महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांचा ताफा अडवला.त्यावेळी आंदोलकांच्या भावना समजून घेण्याचा पत्रकार प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना अटकाव करीत माती सर्वेक्षणाच्या ठिकाणापासून २ कि.मी अंतरावर पत्रकारांनी थांबू नये, असा सज्जड इशारा दिला गेल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांची नाकेबंदी – बारसू -सोलगाव पंचक्रोशीसह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रिफायनरीलाविरोधहोत आहे. रिफायनरी विरोध मोडीत काढून माती सर्वेक्षण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ग्रामस्थ बारसू सड्यावर आगेकूच करत आहे. मात्र, पोलिसांनी सर्व मोक्याच्या ठिकाणी नाकेबंदी केल्याने काहींची अडचण झाली आहे.

अशोक वालम यांची धडक – कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष अशोक वालम सोमवारी पहाटे राजापुरात दाखल झाले होते. त्यांना जिल्हा बंदी असल्याने भूमिगत होते. मंगळवारी दुपारी पोलिसांना चकवा देत नाणार परिसरातील हजारो शेतकरी घेऊन बारसू सड्यावर धडक मारुन रिफायनरी प्रकल्प माती सर्वेक्षण काम थांबवण्याचा प्रयत्न केला..

कोळवणकरांना अटक –  बारसू -सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांच्यासह तिघांना सोमवारी उशिरा पोलिसांनी राजापूर येथे अटक केली. त्यांची रवानगी रत्नागिरी येथे करण्यात आली. यापूर्वी रिफायनरी विरोधी आंदोलनाचे नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. रिफायनरी विरोधी ४५ आंदोलकांना तडीपार नोटिसा बजावल्या आहेत. तडिपारी बजावलेले बहुतांश नेते भूमिगत झाले असून त्यांच्या हालचालीवर पोलिसांची नजर आहे.

आंदोलकांची मनधरणी सुरू बारसू – सोलगाव रिफायनरी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता त्यांचा विरोध मावळण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आंदोलकांचे १० प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र या चर्चेत आंदोलनावर तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले नाही. बारसू सोलगाव पंचक्रोशीतील सरपंच, रिफायनरी विरोधी संघटना, पदाधिकारी यांच्यासमवेत २७ एप्रिल रोजी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.गुरुवारी पर्यावरण तज्ञांची बैठक जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष अशोक वालम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार गुरूवार दि. २७ रोजी प्रशासनाच्यावतीने येणारे पर्यावरणतज्ञ आणि विरोधी संघटना यांच्यावतीने येणारे पर्यावरणतज्ञ यांना एकत्र बोलवून चर्चा केली जाणार आहे. यानंतर प्रदुषण होणार की नाही याचा अहवाल शासनाला सादर करु, असे. आश्वासन जिल्हाधिकारी यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.