उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आज मोठा निर्णय घेत जिल्ह्यात पक्षाची वाताहात होत असतानाही पक्षविरोधी करवाई केल्याप्रकरणी पक्षातील प्रमुख तीन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांना पक्षातून काढून टाकले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि सचिव विनायक राऊत यांच्या स्वाक्षरीने तसा पक्षा आदेश काढला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे अपयश आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाताहात सुरू आहे. सत्तेत नसल्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची कोणतीही कामं होत नाहीत. कार्यकर्ता उभा राहण्यासाठी पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याने अनेक ठाकरे गटामध्ये चलबिचल सुरू होती. त्याचा फायदा उठवत मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरीमध्ये ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाला जिल्ह्यात सुरूंग लावला आहे.
टप्प्याटप्याने ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले. ठाकरे गटातील अनेक माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशापूर्वी चार तास आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी पक्षीय आदेश जारी केला. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. पक्षाला उतरती कळा लागली असताना पक्षाची फेररचना करण्याच्यादृष्टीने ठाकरे गटाने हे धाडसी पाऊल उचलले आहे.
ठाकरे गटाला असे मिळाले संकेत – राजेंद्र महाडिक आमदारकीसाठी अनेक वर्षे इच्छुक होते. त्यांनी संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, यावेळीही त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे ते विधानसभेदरम्यान शिवसेनेत जाण्याच्या तयारीत होते. परंतु, स्थानिक कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागल्यानंतर त्यांच्या घरावर धडकून त्यांचा हा प्रवेश थांबवला होता. विलास चाळके आणि सामंत कुटुंब यांचे व्यावसायिक संबंध आहे. त्यामुळे चाळके हे सामंत कुटुंबीयांच्या जवळ असल्याचा दाट संशय आहे. वेळोवेळी ते निवडणुकांमध्ये त्यांनाच मदत करत असल्याचा ठाकरे गटाचा संशय आहे. माजी आमदार सुभाष बने यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा मुलगा रोहन बनेदेखील शिवसेनेत जाणार हे निश्चित आहे. या सर्वांचा विचार करून ठाकरे गटाने या तिघांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगितले जाते.