आपले नेते एकनाथ शिंदे २० तास काम करत असतील तर त्यांच्यासाठी दिवसातून किमान १ तास पक्षाचे प्रामाणिक काम करा. नाक्यावर बसून पक्षाचे काम होत नाही, प्रत्यक्ष फिरावे लागते. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तिकिटासाठी काम करू नये, संघटना बांधणीसाठी काम करा. आपण स्वतःला फसवतोय. यातून काय निष्पन्न होणार याबाबत आत्मचिंतन करा. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख पक्षाला शिस्त लावण्याची गरज आहे. कटू वाटत असेल पण खरं बोलतोय, अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. सामंत म्हणाले, लोकसभेचे ४८ उमेदवार निवडून देऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न सगळ्यांनी साकार करूया.
कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी तिकिटासाठी काम न करता पक्षाच्या संघटन बांधणीसाठी झोकून काम करा. पक्षाचे गटप्रमुख, शिवदूत, शाखाप्रमुख यांनी पक्षाच्या संघटना बांधणीसाठी काम करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. ८ तारखेला राजापुरात होणाऱ्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यांच्या सभेचे नियोजन करण्यासाठी तीन तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. कोट्यवधीची विकासकामे केली, निधी आणला; पण त्याचा पक्षाला काय फायदा झाला? आऊटपूट काय याचा विचार केला आहे का ? माझ्याकडे ताकद आहे म्हणून ठीक आहे.
मी ५०, ६० हजार लोक गोळा करू शकतो. आपल्यामागे काय आहे, याचा विचार प्रत्येक पदाधिकाऱ्याने करण्याची गरज आहे, असे त्यांनी सुनावले. सामंत म्हणाले, तुम्ही स्वतःहून तिकीट जाहीर करू नका. ते फक्त एकनाथ शिंदे यांना अधिकार आहेत. आपण या भागात कमी आहोत तर तसे सांगा आणि ताकद असेल तर दाखवून द्या. नाक्यावर काम नको फिल्डवर राहा. दुःख वाटते की, मी राजापूरसह अनेक ठिकाणी कामे दिली. त्याचा फायदा आपल्याला झाला का ? माझी खंत ही आहे. देवरूखला २० कोटी दिले तिथे परिस्थिती चांगली आहे. अनेक ठिकाणी आपले शाखाप्रमुख, पदाधिकारी अजून पोहोचले नाहीत ही खंत आहे.