ख्रिसमस मूड ऑन. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या धामधुमीला आतापासूनच सुरुवात झाली असून, मुंबई, पुणे, नाशिक अन्य ठिकाणाहून अनेक पर्यटक कोकण, गोवा मध्ये जायला सुरुवात झाली आहे. एसटीच्या सुरु असलेल्या बेमुदत संपामुळे अनेक पर्यटकांनी खाजगी वाहनाने आपली इच्छित स्थळे गाठली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हायवेवर ट्राफिक जाम झाले आहे.
ख्रिसमसला जोडून आलेल्या सुट्टीमुळे पुणे, मुंबईतील नागरिक मोठय़ा संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडल्याने शुक्रवारी २४ डिसेंबर रात्रीपासूनच मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. खंडाळा ते खालापूर टोलनाक्या दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती.
नवीन वर्ष एकत्र घालवण्यासाठी अनेक जण सहकुटुंब विविध ठिकाणी बाहेर पडतात. मुंबई परिसरातील नागरिक पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळा, माथेरान परिसरात जातात. द्रुतगती मार्गावर मोठय़ा संख्येने वाहतूक सुरु झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला आहे. अनेक पर्यटक कोंडीत अडकून पडल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. काल शनिवारी घाट क्षेत्रात गाड्यांची लांबवर रांग लागली होती.
कोल्हापूर, सातारा, पुण्याहून मोठय़ा संख्येने पर्यटक कोकण तसेच परिसरात पर्यटनासाठी मार्गस्थ झाले आहेत. द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी वाहतुकीचा वेग मंदावला होता. लोणावळा शहरातील मुख्य रस्ते, पवना नगर धरण परिसर तसेच खोपोली ते लोणावळा दरम्यान घाटक्षेत्रात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दृश्य पाहावयास मिळाले आहे. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी घाट क्षेत्र तसेच द्रुतगती मार्गावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. जेणेकरून वेळीच वाहतुकीची कोंडी फोडण्यात यश येईल.