भारतीय संस्कृतीमध्ये दान करण्याला अनन्य साधारण महत्व आहे. अन्नदान, गोदान इ. पद्धती या पूर्वापार आलेल्या आहेत. आताच्या युगामध्ये मरणोत्तर देहदान, नेत्रदान, अवयव दान, अशा प्रकारची दान करण्यासाठी समाज पुढे येत आहे. मोठ्या प्रमाणात अनेक सामाजिक संस्थांकडून त्याची जनजागृती केली जात असते.
आपल्या मृत्युनंतर जर आपल्या अवयव दानाने एखाद्याला जीवनदान मिळणार असेल तर याहून उच्च दान ते कोणते ? जन्मतःच एखाद्याला काही व्यंग असते, एखादा अवयव नसतो, असलेल्या अवयवांमध्ये काही बिघाड झालेला असतो. अशा एक ना अनेक अडचणीना मनुष्य समोर जात असतो.
रत्नागिरीतील लायन्स क्लब नेत्र रुग्णालमार्फत नेत्रदानाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी येथे नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. जगातील एकूण दृष्टिहीन व्यक्तीपैकी सुमारे २० टक्के म्हणजे दृष्टिहीन भारतामध्ये आहेत. त्यातील सुमारे २५ टक्के नेत्रहीन व्यक्तींना नेत्ररोपणाने पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ शकते.
दरवर्षी देशात अनेक कारणांमुळे लाखाच्या घरात मृत्यू होतात. परंतु त्यातील केवळ तीस हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते. नेत्रदान हे रक्तदानासारखे जिवंतपणी करावयाचे नसून मरणोत्तरच करावयाचे असते. आतापर्यंत रत्नागिरी शहर आणि परिसरामध्ये नेत्रपेढी किंवा नेत्रसंकलन केंद्र उपलब्ध नव्हते. पण गेल्या ४ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर नेत्रदानाची सोय पुण्यातील एच. व्ही. देसाई नेत्रपेढी आणि रत्नागिरीतील लायन्स नेत्ररुग्णालयाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्रविभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे या सेवेसाठी सहकार्य लाभणार आहे. रत्नागिरीवासियांनी नेत्रदान चळवळ ही राष्ट्रीय गरज असल्याची जाणीव ठेवून या चळवळीत जास्तीत जास्त सहभाग नोंदवून दृष्टिहीन बांधवाना आपल्या मृत्यूनंतर सुंदर जग दाखवण्यासाठी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.