जिल्ह्यात फसव्या जाहिरातीमुळे अनेक जण आपले आर्थिक नुकसान करून बसतात. अशाच एका फसवणूकीचा प्रकार दापोलीमध्ये घडला आहे.
सांगली शहरातील ग्लोबल मल्टीलेवल मार्केटींग कंपनी ६ महिन्यापूर्वी उदयास आली. शेअर ट्रेडिंगची हल्ली सगळीकडे चर्चा आणि गुंतवणूक होत आहे. फोरेक्स मार्केटमध्ये आम्ही ट्रेडिंग करतो असे सांगत या कंपनीच्या एजंटांनी दापोलीपर्यंत आपले जाळे पसरवले आहे. जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यातील लाटवण परिसरातील एका पोस्ट खात्यामध्ये काम करणार्या एजंटला हाताशी धरून दापोलीतील गुंतणवणूकदारांकडून गेल्या ६ महिन्यापासून पैसे गोळा करण्यास सुरूवात झाली.
सहा महिन्यात दामदुप्पट पैसे आणि एजंटना तब्बल २० टक्के कमिशन असे आमिष दाखवत सांगली येथील एका ग्लोबल मल्टीलेवल मार्केटींग कंपनीने दापोलीकरांना ८० कोटी रुपयांचा चुना लावून, गाशा गुंडाळून फरार झाली आहे. आणि परदेशात फरार झाल्यानंतर कंपनीच्या मालकांनी एका ऑडिओ क्लीपद्वारे आपण आता शून्य झालो असून यापुढे कंपनीच्या नावावर कोणीही पैसे गोळा करू नयेत असा मेसेज गुंतवणूक दारांना पाठवला आहे.
यामध्ये गुंतवणूक करताना, सुरूवातीला ५०० डॉलर म्हणजेच ३८ हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक केल्यावर दरमहा ६ ते ९ टक्के इतका परतावा देण्यात येणार असल्याचे सांगत ७७ हजार पासून ७७ लाख रुपयांपर्यंतचे आकर्षक पॅकेज तयार केले होते. ७७ लाखांची गुंतवणूक करणार्या गुंतवणुकदाराला दरमहा १८ ते २० टक्के इतका भरघोस परतावा देण्याचे कंपनीने एजंटमार्फत सांगितले होते.
ग्लोबल कंपनीत खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, कोल्हापूर या परिसरातून दापोलीमधील एजंटमार्फत तब्बल ८० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. अल्पावधीतच दामदुप्पट आणि आकर्षक भरघोस कमिशन यामुळे अनेक एजंटांनी आपली तुंबडी भरत नेहमीप्रमाणे नामानिराळे राहून यावेळीही गुंतवणुकदारांकडे दुर्लक्ष केले आहे.