निसर्ग आणि मानवी अभिव्यक्तीचा अनोखा संगम असलेले देवीहसोळ गाव अन् येथील सड्यावरील संशोधित झालेल्या कातळशिल्पाच्या माध्यमातून या परिसरामध्ये अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व असल्याचा दावा केला जात आहे. त्या दृष्टीने निसर्गयात्री संस्थेचे अन्य संस्थांच्या साहाय्याने दस्तऐवजीकरण आणि मोठ्या प्रमाणात संशोधनाचे काम सुरू आहे. आर्यादुर्गा मंदिरालगतच्या चौकोनी उठावाच्या रचनेसोबतच विस्तीर्ण सड्यावरील नव्याने प्रकाशात आलेल्या मानवी अस्तित्वाच्या समृद्ध पाऊलखुणांमुळे देवीहसोळचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
देवीहसोळच्या सड्यावर आढळून आलेली अनोखी भव्य प्रागैतिहासिक कातळशिल्प, अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे, ऐतिहासिक कालखंडातील पायऱ्यांच्या विहिरी, कातळावरील पाणी नियोजन व्यवस्था, आर्या दुर्गा मंदिर, मंदिरातील उत्सव, प्रथा आणि जत्रा, मुचकुंदी आणि बेनी नद्यांचा संगम, अफाट निसर्गसौंदर्य, भौगोलिकदृष्ट्या हटके असलेला हा परिसर अशी देवीहसोळच्या सडा परिसराची ओळख निर्माण झाली आहे.
भविष्यामध्ये वारसा पर्यटन या क्षेत्रात देवीहसोळ हे महत्त्वपूर्ण गाव बनेल, असा विश्वास व्यक्त करून धनंजय मराठे म्हणाले, जागतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आर्यादुर्गा मंदिर व्यवस्थापनासह स्थानिक गावकऱ्यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य मिळते. ग्रामस्थांनी वारसा संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराला शासन प्रशासनाची सुयोग्य साथ मिळणे अपेक्षित आहे. गावात पर्यावरणपूरक पर्यटन विकासासाठी ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांशीही संवाद सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध – देवीहसोळ परिसरातील कातळशिल्प आणि तत्कालीन मानवाच्या अधिवासाचे पुरावे यावर इंडियन सोसायटी फॉर प्रेहिस्टोरीक अॅन्ड क्वॉटेमरी स्टडीज यांच्याद्वारे कोटा, राजस्थान येथे यावर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्रातर्फे दोन शोधनिबंधाचेही सादरीकरण करण्यात आले.
दस्तऐवजीकरणाचे काम सुरू – विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारच्या पुढाकाराने, आयआयटीएम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन, आयआयटी मद्रास आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीद्वारा संचलित आयआयटी हैद्राबाद, जेएनयू दिल्ली यांच्या सहयोगाने कोकणातील कातळशिल्प समग्र डिजिटल दस्तऐवजीकरण आणि सखोल संशोधनाचे काम सुरू आहे.