उत्तरेकडील थंड वाऱ्याचा जोर वाढला असल्यामुळे राज्यात किमान तापमानात घट झाली असून, कोकणातही थंडीची तीव्रता जाणवत आहे. वाऱ्यांमुळे दिवसाही गारवा जाणवत होता. सकाळच्या सत्रात फिरण्यासाठी बाहेर पडणारे नागरिकही गरम कपडे परिधान करून होते. सगळीकडे शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत किमान तापमान १०.७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. कर्नाटकच्या किनारपट्टीपासून छत्तीसगडपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे सगळीकडेच थंडीचा जोर वाढला आहे. कोकणातही रत्नागिरीत पारा १९ अंशापर्यंत खाली आला आहे. कमाल तापमानही ३० अंशापर्यंत आहे. २० जानेवारीनंतर त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
दापोलीमध्ये गेले चार दिवस दिवस पारा ९ ते १२ अंश सेल्सिअसदरम्यान राहिला आहे. १६ जानेवारीला यंदाची सर्वात कमी नोंद ९.४ अंश सेल्सिअस झाली होती. १८ ला १२.१ तर १९ ला किमान तापमान १०.७ अंश आहे. कमाल तापमान २७.७ अंश आहे. ग्रामीण भागामध्ये सकाळच्या सत्रात धुक्याची दुलई पसरलेली पाहायला मिळत आहे. सकाळी हवेत गारवा असल्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी जाणारे सर्वच वयोगटातील नागरिक स्वेटर, कानटोपी, हातमोजे घालून बाहेर पडत आहेत. रात्रीच्यावेळी विविध ठिकाणी रखवालदार म्हणून काम करणारे शेकोट्या पेटवून उष्मा राखण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
बागायतदार समाधानी – दरम्यान, थंडीचा परिणाम हापूसच्या वाढीला फायदेशीर ठरत असल्यामुळे बागायतदार समाधानी आहे. मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे आंब्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव सुरू होता. त्याला आळा घालण्यासाठी औषध फवारणीवर भर दिला गेला होता. त्याचा मोठा फटका बागायतदारांना बसला. त्या तुलनेत उत्पादन किती येणार, याकडे आंबा बागायतदारांचे लक्ष लागले आहे.