जिल्ह्यात पावसामुळे १ कोटी ३५ लाखाचे नुकसान झाले आहे. यामध्ये १८२ अंशतः घरांचे ६८ लाखाचे, ३४ गोठ्यांचे १७ लाखाचे नुकसान झाले आहे. तर राजापूर येथे १ मयत झाला असून त्याला शासनाकडून ४ लाखाची मदत देण्यात आली आहे. तीन जखमी असून त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आले. जिल्ह्यातील २ अंगणवाड्या, १६ शाळा, ५६ साकवांचेदेखील नुकसान झाले तर नैसर्गिक आपत्तीचा धोका डोळ्यासमोर ठेवून ६०१ कुटुंबातील २ हजार १७८ जणांना स्थलांतरित ‘केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम असल्याने मंगळवारी कोकण आयुक्तांनी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्याचा आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील दरड प्रवण भागाची तलाठी, सर्कल यांच्याकडून बुधवारपासून प्रत्यक्ष जागेवर जाऊन फेरसर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी ९४५ कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अन्य अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे.
मुचकुंदी नदी सोडली तर इतर नद्या इशारा पातळीवर आहेत तर जगबुडी नदी धोका पातळीवर आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ५५.८ टक्के म्हणजे ३३६४.०२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दरडप्रवण गावांची संख्या १८१ आहे. चार टप्प्यामध्ये त्याची विभागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात् अतिधोकादायक आहे अशा १२ गावांमधील १०० टक्के स्थलांतर केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील १३ गावे, ३ टप्प्यातील ७९ तर चौथ्या टप्प्यातील ४६ कुटुंबांना अशी एकूण १ हजार ७०० तर पूरप्रवण भागातील ५० गावे आहेत. तेथील १३० कुटुंबातील ४७७ लोक, अशी मिळून २ हजार १७८ लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन केले आहे. त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
परंतु ९० टक्के लोक आपल्या नातेवाईंकडे स्थलांतरित झाले आहेत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील ६०१ कुटुंबातील २ हजार १७८ जणांना स्थलांतरित केले आहे. नातुवाडी येथील मोरेवाडीतही दरड कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्याची तत्काळ खात्री करून तेथील ४ कुटुंबातील १० जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण १८१ दरडप्रवण क्षेत्र असून पुन्हा एकदा कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा मिळाल्याने या दरडप्रवण भागांचे फेर सर्व्हेक्षण केले जाणार आहे. त्याचा अहवाल कोकण आयुक्तांना पाठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.