वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही अनेक मच्छीमारांना समुद्रावर स्वार होणे शक्य झाले नव्हते. मात्र, शनिवारपासून वारे थांबल्यानंतर समुद्रही शांत झाला आहे. त्यामुळे गिलनेटद्वारे मासेमारीला आरंभ झाला आहे. पूर्णगड ते वरवडे या परिसरात सध्या बांगडा, व्हाईट चिंगळं मच्छीमारांना मिळत आहेत. पर्ससिननेट बंद असल्यामुळे बांगड्याला किलोला २०० रुपये दर मिळत असल्याने मच्छीमार समाधानी आहेत. ट्रॉलिंगच्या काही नौका मासेमारीसाठी गेल्या होत्या; पण अपेक्षित मासे मिळाले नाहीत. गिलनेटच्या नौकांना चार दिवसात मुहूर्तच साधता आला नव्हता. वेगवान वाऱ्यामुळे नौका समुद्रात नेणे शक्य नव्हते. वातावरण शांत झाल्यानंतर छोटे मच्छीमार मासेमारीसाठी रवाना झाले. सलग दोन दिवस चांगले गेले असून, रिपोर्टही मिळाला आहे. सुरुवातीपासूनच बांगडा मिळत आहे.
एका नौकेला १० टप (एक टप ३२ किलोचा) सरासरी तर ५० ते ६० किलो व्हाईट चिंगळं मिळतात. बांगड्याला किलोला २०० रुपये आणि चिंगळाला किलोला ३०० पासून रुपये दर आहे. गतवर्षी बांगड्याचा दर घसरला होता. किलोला ५० रुपयांपर्यंत खाली आला होता. सध्या गणपतीपुळे, वरवडे येथे विविध प्रकारचे मासे मिळत आहेत. त्यामुळे यंदा सुरवात चांगली झाली आहे; मात्र पर्ससिननेट मासेमारी सुरू झाली की, गिलनेटवाल्यांना मिळणाऱ्या बांगड्याचा दर घसरतो. पर्ससिननेट मासेमारीला १ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. तोपर्यंत छोट्या मच्छीमारांना दिलासा आहे.
केंड माशाचा त्रास – सुरवातीलाच केंड हा मासा मोठ्या प्रमाणात आला आहे. या माशाला टोकदार दात असल्यामुळे तो जाळी कुरतडतो आणि नुकसान करतो. तसेच माशांनाही मारतो. त्यामुळे सध्या मासेमारीला जाणाऱ्या मच्छीमारांपुढे केंडच्या झुंडीपासून जाळी सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आहे.