दापोली हर्णे बंदर हे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. अनेक लहान मोठ्या बोटी, जहाजे येथे किनाऱ्यावर लागलेली असतात. मच्छीमारी हा तेथील सर्वात मोठा व्यवसाय. तिथून मोठ्या प्रमाणत मच्छी उतरवली जाऊन मग त्याची बाजारात विक्री केली जाते. त्यांमुळे हर्णे बंदर हे कायमच मच्छी साठी गजबजलेले असते. ताजी फडफडीत मच्छी मिळण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. पण सध्या ते एका वेगळ्याच गोष्टीने चर्चेत आले आहे.
सुरेश नारायण चोगले यांच्या मालकीची सप्तश्रृंगी ही मासेमारी बोट हर्णे बंदरावर आहे. या मासेमारी बोटीवर काम करणार्या परराज्यातील खलाशी दारू पिऊन आपापसात मारामारी करत असताना त्यांना दिसले. त्यामुळे त्यांची मारामारी सोडवण्यासाठी गेले असता, बोटीच्या मालकालाच शिवीगाळ करून बोटीवरील साहित्य घेवून त्यांनी पळ काढल्याची तक्रार सुरेश चोगले यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या मासेमारी बोटीवर अमरकुमार राजभर, राबविलाच राजभर, सुरज राजभर, मनोज राजभर, रा. सोंदाडी, झारखंड हे खलाशी म्हणून काम करत होते. २१ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वा. सुमारास हर्णै येथील जेटीवर हे खलाशी दारू पिवून तर्रर झाले होते. आणि दारू पोटात गेल्यावर त्यांना कसलेच भान राहिले नव्हते. काहीशा कारणावरून त्यांच्यात मारामारी सुरु झाली. हे पाहून बोटीचे मालक सुरेश चोगले व त्यांचा भाऊ हेमंत हे मारामारी सोडविण्यासाठी गेले. अमरकुमार राजभर हा सुरी घेवून सुरेश चोगले यांच्या अंगावर धावून गेला. चारही खलाशांनी सुरेश चोगले यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. खलाशांची मारामारी सोडविताना मधी पडल्यामुळे झालेल्या झटापटीत हेमंत चोगले यांच्या उजव्या हातच्या अंगठ्याला दुखापत झाली.