कोकणातील दापोली आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे निसर्गसौंदर्याची दैवी देणगी आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांची कायमच गर्दी असते. निळाशार स्वच्छ समुद्रकिनारा, जैव विविधता, आल्हाददायक वातावरण त्यामुळे पर्यटकांची वर्दळ मोठ्याच प्रमाणात असते. शासनाने सुद्धा येणाऱ्या पर्यटकांच्या विविध सोयी सुविधांसाठी आकर्षक योजना राबविण्याकडे लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून येथील पर्यटन व्यवसायाला उभारी येईल.
दापोली तालुक्यामध्ये येणारे पर्यटक हे विविध ठिकाणाहून येणारे असतात, त्यामुळे खाजगी वाहनानेच अनेक पर्यटक येतात. त्यामुळे पर्यटक वाढीसाठी राष्ट्रीय प्रमाणेच आंतरराष्ट्रीय देखील पर्यटक वाढावेत यासाठी दापोलीमध्ये विमानतळ स्थापण्याची मागणी लाडघर बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुक्यातील हर्णैजवळील २३५ एकर जागा विमानतळासाठी सुचविण्यात आलेली आहे. यामध्ये २१७ एकर जागा सपाट व शासकीय गायरान म्हणून उपलब्ध आहे. यापैकी पाच टक्के जागा नियमाप्रमाणे लागवडीसाठी सोडून उर्वरित जागेत विमानतळ करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. ही जागा रेवसरेड्डी राष्ट्रीय महामार्गापासून केवळ १ कि.मी. अंतरावर असल्याने विमानतळावरून येणे-जाणे देखील सोयीचे होऊ शकणार आहे. त्यामुळे पर्यटन वाढीच्या दृष्टीने विमानसेवा लवकरात लवकर सुरु करण्याबाबत सकारात्मक विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या जागेपासून रत्नागिरीचे विमानतळ १५० कि.मी. अंतरावर नवी मुंबईचे विमानतळ २०० कि.मी. अंतरावर आहे. शिवाय विमानतळासाठी सुचविलेली जागा हर्णै सुवर्णदुर्ग किल्ल्ल्यापासून तीन कि.मी. अंतरावर तसेच श्रीवर्धन, गुहागर, खेड व मंडणगड तालुक्यातील केवळ पन्नास कि.मी.च्या आत असल्याने या सर्व तालुक्यांना या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे.