कोरोना काळामध्ये अनेक जणांना संसर्ग झाला होता. त्यामुळे जाणवणारी थकवा, भुकेची समस्या, डोळ्यांच्या समस्या, मेंदूशी संबंधित समस्या काही प्रमाणात या शारीरिक तक्रारींचा सामना करावा लागतो. या सगळ्या सोबतच किडनीची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे ३० टक्के लोकांची किडनी खराब झाली आहे.
एखाद्या व्यक्तीला संसर्ग होतो तेव्हा विषाणू या ऊतींचे नुकसान करतात. संसर्गा व्यतिरिक्त आपली चुकीची दिनचर्या हे देखील मूत्रपिंड निकामी होण्याचे एक मोठे कारण आहे. कोणत्याही आजारावर डॉक्टरी सल्ल्याने औषध घेणे अत्यंत गरजेचे असेल तर त्यासोबत जास्त पाणी प्यावे. वेदनाशामक औषधांचा सतत वापर केल्याने किडनी फिल्टर करणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. त्यामुळे किडनीची फिल्टरिंग क्षमता कमी होते. व्यक्तीमध्ये किडनी स्टोनसह अनेक समस्या उद्भवू लागतात. अधिक पाणी पिणे शक्य होत नसेल तर, अधिकाअधिक द्रवपदार्थ, पाणीदार फळांचे सेवन करावे.
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम हे सर्वोत्तम औषध आहे. त्यामध्ये सुद्धा योगा, ध्यानधारणा हे अतिशय उपयुक्त. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मूत्रपिंड रक्त फिल्टर करतात आणि लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. जास्त वेळ बैठे काम असेल तर त्याचा दाब सुद्धा किडनीवर होतो त्यामुळे दर ३० ते ४५ मिनिटांनी उभे राहावे. थोड चालण्याचा, जागेवरच धावण्याचा तसेच ३० मिनिटांचे एरोबिक व्यायाम करावेत.
वारंवार थकवा येणे, भूक न लागणे व सूज येणे अशा गोष्टी जर घडत असतील तर आहारामध्ये थोडा फार बदल करणे गरजेचे आहे. तसेच सफरचंद, द्राक्षे, लिंबू वर्गीय फळाचा समावेश केल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. लसूण प्रकारामध्ये दाह विरोधी गुणधर्म असतात याने देखील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. निरोगी व्यक्तीला ८ ते १० ग्लास पाण्याची गरज भासते. कामाच्या दरम्यान ब्रेक घेताना पाणी किंवा एखादे रसदार फळ खावे.