विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कदम हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असताना पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय कदम यांची हकालपट्टी केली आहे. याबाबत पत्रकदेखील जारी करण्यात आले आहे. माजी मंत्री आणि शिवसेना रामदास यांच्यासोबत नेते कदम संजय कदम यांची मुंबईमध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये पक्षप्रवेशासंदर्भातली चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार, अशी चर्चा सुरू असतानाच ही कारवाई झाली. शिवसेनेमधूनच संजय कदम यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. मधल्या काळात शिवसेनेमध्ये वाद झाल्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि तिथूनच आमदार म्हणून निवडून आले. योगेश कदम सक्रिय झाल्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही वर्षे ते राष्ट्रवादीतच काम करत होते. दरम्यानच्या काळात शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन गट झाल्यानंतर योगेश कदम हे शिंदेंच्या सोबत राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा शिवबंधन बांधून शिवसेना ठाकरेंच्या पक्षात सक्रिय झाले.
राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा संघर्ष झाला. यात संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. कोकणात ठाकरेंचे निष्ठावंत अशी त्यांनी पुन्हा एकदा स्वतःची ओळख निर्माण करून घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्यावर उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मशाल चिन्हावर संजय कदम यांनी निवडणूक लढवली; परंतु, दापोली मतदारसंघातील आमदार योगेश कदम यांनी त्यांचा २५ हजार मतांनी पराभव केला. संजय व रामदास कदम यांची बैठक झाल्याची बातमी सोशल मीडियावर आली; परंतु शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याअगोदरच ठाकरे गटाने त्यांच्यावर रितसर हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे ऐन शिमगोत्सवात आणि कडाक्याच्या उन्हाळ्यात दापोलीचे राजकारण हळूहळू चांगलेच तापू लागले आहे.
कदम विरुद्ध कदम वाद थंडावणार – दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघांमध्ये कदम विरुद्ध कदम हा सामना गेली आठ वर्षे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि संजय कदम यांच्यामधील वाद अनेकवेळेला विकोपालाही गेलेला होता. मात्र, संजय कदम यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेमुळे हा वाद थंडावणार आहे.