समुद्राला आजपासून २७ जुलैपर्यंत सलग ४ दिवस मोठी भरती येणार आहे. आज पहिल्याच दिवशी मिऱ्या, भगवती बंदर, मांडवी, काळबादेवी आदी ठिकाणी सुमारे साडेतीन ते चार मीटरच्या लाटा उसळत होत्या. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांनी भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे. तसेच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाकडूनही पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७३.४६ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड १०५, खेड ७२.१४ मिमी, दापोली ८०.५७, चिपळूण ८४.२२, गुहागर ४९.२०, संगमेश्वर ५८.९१, रत्नागिरी ५५.५५, लांजा ६३.२०, राजापूर ९२.३७ मिमी पाऊस झाला आहे. आज दिवसभर जिल्ह्यात सरींचा पाऊस सुरू आहे.
कोकणात किनारपट्टी भागात मोठ्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या (ता. २५) दुपारी १२.४० वाजता लाटांची उंची ४ मीटर असणार आहे. शनिवारी (ता. २६) दुपारी १.२० वाजता लाटांची उंची ४.६७ मीटर असेल तर रविवारी (ता. २७) दुपारी १.५६ वाजता लाटांची उंची ४.६० मीटर राहील, अशी शक्यता आहे. आज अमावास्येच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी-मांडवी समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळत होत्या, तर भगवती बंदर येथील ब्रेकवॉटर वॉलवर सुमारे तीन ते चार मीटरच्या लाटा उसळत होत्या. मिऱ्या बंदर येथेही लाटांचे तांडव पाहायला मिळत होते. येथील संरक्षक बंधारा मजबूत असल्यामुळे किनारा ओलांडून पाणी येऊ शकले नाही. उधाणाच्या लाटा पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व पर्यटक मिकिनारी आले होते.