शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषद किंवा पालिकेच्या शाळांमध्ये होणारी गर्दी काळानुरूप कमी होऊ लागली आहे. खासगी सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे सर्वच थरातील पालकांचा कल वाढला आहे. कोणतेही शुल्क किंवा सध्या प्रचलित असलेले डोनेशन भरण्यास अगदी सर्वसामान्य पालक तयार होतात. छोट्या शिशूपासून खासगी शाळांकडे पालकांचा कल असल्याने पालिकेच्या शाळेत पहिलीपासून येणाऱ्या मुलांचीच संख्या रोडावत चालली आहे. रत्नागिरी पालिकेच्या एकूण २२ शाळा होत्या; परंतु काही वर्षांपूर्वीच चार शाळांना पटसंख्या घसरल्याने त्या बंद करण्यात आल्या. तेथील मुले जवळच्या शाळांमध्ये वर्ग करण्यात आली.
पालिकेच्या आता १८ शाळा आहेत. यामध्ये २०२२ला २ हजार ७५ एवढी पटसंख्या होती तर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ती काही प्रमाणात वाढली असून, २ हजार १३१ म्हणजे ५६ एवढी पटसंख्या वाढली आहे; परंतु दुसरीकडे चवंडेवठार, उर्दू, निवखोल व अन्य ठिकाणची एक अशा ४ शाळांची पटसंख्या चिंताजनक आहे. अवघे १० ते १४ विद्यार्थी या शाळांमध्ये असल्याने त्यांना घरघर लागली आहे; परंतु पालिकेच्या दामले विद्यालयाची या उलट परिस्थिती आहे. तेथील सुंदर परिसर, चांगली भौगोलिक स्थिती, वाढलेल्या सुविधा आदींमुळे या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सेमी इंग्लिशचा’ येथील पॅटर्न यशस्वी झाल्यानंतर आता ८, ९वीचे वर्ग सुरू केले आहेत. पालिका प्रशासनान आता दामले विद्यालयाचा पॅटर्न इतर शाळांमध्ये राबवला तरच पटसंख्या वाढणार आहे.