धो धो पाऊस कोसळत असताना आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमुक्तीसह प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मचांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पारपर्यंत धरणे आंदोलन करत शासनाचा तीव्र निषेध नोंदवला. ‘आमच्या समस्या निवारण करण्यासाठी आम्हाला तब्बल ७ वर्षे लढा द्यावा लागतोय. यापुढे होणारे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे असेल’, असा इशारा देखील आंबा बागायतदारांनी दिला आहे. आंबा बागायतदारांनी मागण्यांबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांना निवेदन सादर केले.
गेली ७ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी शासन दरबारी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन हेलपाटे मारताना दिसत आहेत. दरवेळी नवनवीन आश्वासने देऊन आंबा बागायतदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा एककलमी कार्यक्रम शासनाकडून झाला आहे. आज आंबा उत्पादक शेतकरी हा कर्जाच्या खाईत लोटला जात असताना शासन शेतकऱ्यांप्रमाणे आंबा बागायतदारांना अपेक्षेनुसार पॅकेज जाहीर करेल, अशी आशा होती. मात्र आजतागायत या बागायतदारांना भरीव मदत शासनाकडून झाली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
१२०० कोटींची मागणी – येथील आंबा बागायतदार सध्या म मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी शासनाकडून आपल्याला पॅकेज मिळावे अशी सातत्याने मागणी केली. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान शासनाने १२०० कोटी रूपये दिल्यास आंबा बागायतदारांचे सर्व प्रश्न धसास लागू शकतात. परंतु आंबा बागायतदारांचे प्रश्न कुणीही गांभिर्याने घेत नसल्याची खंत व्यक्त बागायतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.
रयतेचा विसर – आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदारांनी मंगळवारी भर पावसात केलेल्या आंदोलनाला सर्वच पक्षीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवत पाठिंबा दिला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला संघटक साक्षी रावणंग यांनी आंबा बागायतदारांना पाठिंबा देताना, शासन फक्त शिवरायांचे नाव घेते परंतु त्यांच्या आदर्शाप्रमाणे रयतेची काळजी घेत नसल्याची भावना व्यक्त केली.
सरकारला आंबा दिसत नाही – यावेळी माजी जि.प. अध्यक्ष उदय बने म्हणाले की, द्राक्ष दिसतील, डाळिंब दिसतील, मोसंबी दिसते, मात्र सरकारला आंबा काही दिसत नाही. आपल्याला वेळ पडली तर आंबा संशोधनासाठी विद्यापीठावर देखील मोर्चा काढावा लागेल. बँकांनादेखील म झा प्रश्न आहे की प्रत्येक बँकेने प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी मंडळ स्थापन करायचे आहे. त्यांनी किती गावात शेतकरी मंडळ केले, असा सवाल उदय बने यांनी उपस्थित केला.
सातबारे कर्जमुक्त करा – आंबा, काजूच्या छोट्यामोठ्या उत्पादकांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकऱ्यांचे सातबारा उतारे कर्जमुक्त झाले पाहिजेत. फळबागायतदारांच्या विम्याचे निकष बदलले पाहिजेत. आंबा बागायतदारांना कृषीपंपानुसार बिल आले पाहिजे अशा भूमिका बागायतदारांनी व्यक्त केली. आंब्यावर पडणारे रोग याचा अभ्यास करण्यासाठी कृषी विद्यापिठाचे केंद्र रत्नागिरीत व्हावे अशी मागणी केली जात आहे, परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने आंबा बागायतदार उपस्थित होते.
भाजपचा पाठिंबा – आंबा बागायतदारांवर अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरोधात बागायतदारांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला भाजपाचे नुतन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भेट देत यावेळी बागायतदारांचे प्रश्न समजून घेतले. आपण याबाबत बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी बोलून यातून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले.
उत्पादक व विक्रेत्यांची उपस्थिती – कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सह. संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, नंदकुमार मोहीते, सचिन आचरेकर, विकास सावंत, प्रदीप सावंत, मंगेश साळवी, मन्सुर काझी, अमृत पोकळे, किरण तोडणकर, अशोक भाटकर, प्रल्हाद शेट्ये, ज्ञानेश पोतकर यांच्यासह मोठ्या संख्येने आंबा बागायतदार भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. शासकीय धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला.