कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव निमित्त सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांची तिकिटे दोन ते तीन महिने आधी काढून देखील या गाड्या चार ते सहा तास उशिराने धावत असल्याने चाकरमानी त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमुळे अनेक चाकरमान्यांनी रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक शनिवार दि. १६ रोजी पासून पूर्णपणे कोलमडून गेले आहे.
त्यामुळे या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट बुक केलेल्या चाकरमान्याना मात्र या प्रकाराने नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ आपल्या गावी पोहोचण्यासाठी लागत असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावर झालेल्या या गोंधळामुळे मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात देखील गोंधळ झाला आहे. या विस्कळीत वेळापत्रकाला नियंत्रणात आणण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून, आगामी उत्सव काळात ही परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा कोकणवासीय व्यक्त करत आहेत.