27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriश्री क्षेत्र गणपतीपुळे | Ganapatipule

श्री क्षेत्र गणपतीपुळे | Ganapatipule

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हा गणपती स्वयंभू आहे आणि या गणेशाचे स्थान समुद्रकिनारी वसलेले असे अतिशय मनमोहक आणि अस्थिर मनाला शांतात देणारे आहे. ह्या मंदिराची अनेक खास वैशिष्ट्य आहेत. हे मंदिर समुद्रकिनारी असून किनारा आणि मंदिर यातील अंतर जेमतेम काही मिनिटाचेच आहे.

गणपतीपुळे मंदिर | Ganapatipule Temple

कोकणातील प्रत्येक देविदेवतांबद्द्ल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. आज आपण श्रीक्षेत्र गणपतीपुळे Ganapatipule बद्दल माहिती पाहणार आहोत. या लेखाच्या आधारे एक छोटीशी सहलच तिथून घडवून येऊ. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र म्हणजे गणपतीपुळे. कोणताही पर्यटक रत्नागिरीमध्ये आल्यावर  स्वयंभू गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. गणपतीपुळे मंदिर आणि परिसर एवढा आकर्षक आहे कि, पाऊले आपोआपच मंदिराकडे वळतात.

lord ganesha temple at ganapatipule

गणपतीपुळे आख्यायिका | The Story of Ganapatipule 

स्वयंभू गणपती कसा सापडला | How Swayambhu Ganpati was found in Ganapatipule

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणेशाला वंदन करूनच कार्य सिद्धीस नेण्याची प्रार्थना केली जाते. गणपती हा शिवशंकर आणि पार्वती मातेचा सुपुत्र असा पुराणात उल्लेख आहे. गणांचा ईश म्हणजेच गणेश आणि गणांचा अधिपती म्हणजे गणपती. गणपतीपुळे येथील गणपतीच्या मूर्तीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. हि गणपतीची मूर्ती साधारण ४०० वर्षांची आहे. गणपतीपुळ्यातील हे देवस्थान पश्चिमद्वारी आहे. आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे,  त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी फक्त एक डोंगराच्या पायथ्याशी असलेले केवड्याचे बन होते. या परिसरामध्ये अगदी हातावर मोजण्या इतकीच वस्ती होती. बाळंभटजी भिडे नामक ब्राह्मण त्या ठिकाणी वास्तव्याला होते. त्यावेळी खोतकीच्या प्रथा असत आणि ते गावचे खोत म्हणून ओळखले जात असत. एके दिवशी भिडेंवर अचानक संकट ओढवले  आणि त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी भिडे यांनी आराध्य देवता श्री गणेशाची उपासना करण्यासाठी केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी बसले आणि तिथे निश्चय केला कि, या संकटाचे जो पर्यंत समूळ निवारण होत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही.

दृढनिश्चयी असणाऱ्या भिडे यांना एके दिवशी गणपतीने दृष्टांत दिला कि, मी या ठिकाणी भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशगुळे येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरुपामध्ये प्रकट झालो आहे. माझी मनोभावे सेवा, अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझी सर्व संकटे दूर होतील”. नेमक्या याच कालावधीमध्ये भिडे यांची गाय काही दिवस दूध देत नव्हती. पण गुराख्याने गाईतील काही विशेष लक्षणे जाणली होती, आणि तिच्यावर पाळत ठेवून राहिला. तेव्हा त्याला निदर्शनास आले कि, डोंगरावरील एका शिळेवर गाय दुधाची संततधार सोडत आहे, हा प्रकार त्याने खोतांना सांगितला. त्यांनी लागलीच सर्व परिसराची स्वच्छता केली तर तेथे त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. भिडेनी त्या ठिकाणी गवताचे छप्पर बांधून एक छोटेसेच मंदिर स्थापन केले.

गावाला गणपतीपुळे नाव कसे प्राप्त झाले | How the village got the name Ganpatipule

त्याच छोट्याशा मंदिराचे विस्तारीत रूप म्हणजे श्रीक्षेत्र गणपतीपुळे Ganapatipule. या गावाला हे नाव कसे प्राप्त झाले त्याबद्दल पण थोडं जाणून घेऊया. अर्थात त्याचीही एक कथा आहे. बऱ्याच वर्षापूर्वी आत्ता जो गजबजलेला गणपतीपुळे गाव आहे तशी काही चिन्हच नव्हती. गावामध्ये विशेष अशी वस्ती देखील नव्हती. गावाच्या उत्तरेच्या बाजूपासून वस्तीला सुरुवात झाली. गावाची पश्चिम दिशेकडे उतरण असून, बराचसा भाग पुळणीचा आहे, पुळणीच्या लगतच असेलेले हे स्वयंभू गणपतीचे स्थान म्हणून या गावाची गणपतीपुळे नावाने सर्वदूर ख्याती आहे.

गणपतीपुळे परिसर | Ganpatipule Temple Area

मूषकराज हाथ जोडलेल्या रुपात | Mouse at the entry of Ganapatipule Temple

गणपतीपुळेला लाभलेला समुद्र किनारा अतिशय स्वच्छ व निळ्याशार पाण्याचा असल्याने मंदिरासोबत समुद्राचा आनंद लुटण्यासाठी सगळ्या ऋतूमध्ये पर्यटकांची गर्दी दिसून येते. गणपतीपुळेला प्रवेश करतानाच संस्थान श्रीक्षेत्र गणपतीपुळे लिहलेली एक मोठी कमान उभारण्यात आली आहे. तिथून आतमध्ये काही पावले चालल्यावर मंदिराचे हळूहळू दर्शन घडून यायला सुरुवात होते. दोन बाजूंनी उंचच्या उंच डोंगरामध्ये वसलेलं हे स्वयंभू गणेशाच मंदिर. मंदिराच्या आत शिरतांना बाहेर एक मोठा मूषकराज हाथ जोडलेल्या रुपात नजरेस पडतो.

ganapatipule mouse
Mouse at the entry of Ganapatipule Temple

त्याच्याबद्दल सुद्धा एक दंतकथा आहे. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी मनातील इच्छा देवाजवळ मनमोकळेपणे व्यक्त तर करता आली पाहिजे. म्हणून असे म्हणतात कि या उंदराच्या मूर्तीच्या एका कानावर हाथ ठेवून, दुसर्या कानामध्ये जे आपलं मागण असेल देवाकडे ते सांगितल कि, ते प्रत्यक्ष गणपतीला ऐकू येत आणि देव लवकरात लवकर त्याची प्रचीती भक्तांना देतोच. यामागे सुद्धा श्रद्धेचा भाग आहे. आतमध्ये गेल्यावर, गाभार्यातील गणपतीचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावर जी मनाला शांती लाभते ती अवर्णनीय आहे.

गणपतीपुळे सभामंडप | Ganpatipule Sabhamandap

त्यानंतर मंदिराच्या सभामंडपात काही काळ बसून, देवाचे चिंतन करणे म्हणजे परमसुख. त्याच सभामंडपामध्ये वरच्या बाजूला अथर्वशीर्ष लिहलेले असून, सर्व भिंतींवर विविध स्तोत्र लिहली आहेत.

प्रदक्षिणा मार्ग | Circumnavigation route for Ganpatipule Temple

गणेशाची मूर्ती हि स्वयंभू असल्याने, मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. हा परिसर साधारण १ कि.मी.चा असून, चिऱ्यांची मजबूत पाखाडी त्याला केली आहे. प्रदक्षिणा मारताना अधि मधी लहान मंदिरे आणि नामजप लिहलेले आहेत. मंत्रमुग्ध होऊन सुरु केलेली प्रदक्षिणा तल्लीन होऊन कधी पूर्ण होते हे कळतच नाही. सुरुवात आणि शेवट तिचा मंदिरामध्येच होतो हे विशेष.

गणपतीपुळे मंदिराशेजारील त्रिपूरं | Tripura besides Ganpatipule Temple

मंदिराच्या बाहेर दोन्हीं बाजूला पाच त्रिपूरं आहेत. विशेष करून त्रिपूरारी पौर्णिमेला मंदिराची रोषणाई त्यावरील दिवे प्रज्वलित करून होते. त्या पौर्णिमेचे मंदिराचे दिसणारे प्रकाशमान रुप डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे असते. मंदिराच्या परिसरामध्ये अनेक छोटी मोठी दुकाने आहेत, गणपती विविध रूपातील मूर्ती, पुजा साहित्य, लाकडी खेळणी, विविध रोपांची नर्सरी, खाद्य पदार्थांची दुकाने यांचा मोठ्या प्रमाणात आहेत.

खिचडी प्रसाद | Prasadm in Ganapatipule

दर्शन घेऊन झाले कि, भुकेची जाणीव पोट करून देतेच. दुपारी प्रसाद म्हणून मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दुपार आणि संध्याकाळच्या आरतींनंतर खिचडी भात-लोणचं, शिरा, साबुदाणा खिचडी, गोड बुंदी, खोबरं गुळाचा चुण इत्यादी विविध प्रकारच्या प्रसादाचा समावेश असतो. प्रसादाची चव एवढी अप्रतिम असते कि, त्यापुढे पंचपक्वान्न सुद्धा फिके पडते. या अन्नछत्रासाठी दिवसागणिक दान देण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. मंदिरासमोरचं असणारा स्वच्छ समुद्र किनारा, त्यावर वाळूवर चालताना मधीच शहाळी विकणारे, शेंगदाणे विकणारे यांचा आस्वाद घेणे जरुरीचे असते. किंवा शांतपणे वाळूवर बसून, सूर्याचा अस्त न्याहाळण्याची मजा काही औरच.  

गणेशोस्तवामधली गावातील प्रथा | Ganapati Festival in Ganapatipule Village

अंगारकी, संकष्टी आणि माघ महिन्यातील चतुर्थीला गणपतीपुळेला जत्रेच स्वरूप प्राप्त झालेलं असत. मंदिर परिसराच्या सुशोभीकरणामुळे हे देवस्थान अधिकच खुलून दिसते, मंदिराला केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भाविक आणि पर्यटक आपसूकच तिथे आकर्षिले जातात. भाद्रपद महिन्यामध्ये सर्वांच्या घरी गणपती विविध रूपाने विराजमान होतात. परंतु, रत्नागिरीमधील अशी दोन गावे आहेत जिथे कोणाच्याही घरी घरगुती स्वरूपातील गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जात नाही. ती गावे म्हणजे गणपतीपुळे आणि गणेशगुळे. या दोन्ही ठिकाणच्या मंदिरातील गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचीच पूजा स्थानिक नागरिक येऊन करतात.

गणपतीपुळे जवळील पर्यटन स्थळे | Places to visit near Ganapatipule   

गणपतीपुळेमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्येही अनेक पर्यटन स्थळे निर्माण झाली आहेत. त्याचप्रमाणे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकल्प तेथे राबविले जातात. गणपतीपुळे पासून काहीच अंतरावर प्राचीन कोकण म्हणून एक स्थळ आहे. ज्यामध्ये कोकणाचा प्राचीन काळातील समाज, त्यांच्या वेशभूषा, पेहराव व केशभूषा,  बारा बलुतेदार, जुनी घरगुती, शेतीची वापरली जाणारी उपकरणे व हत्यारे, मातीची भांडी, लाकडी विविध प्रकारची भांडी, पुरातन काळातील मंदिरांचे नमुने, घरे यांच्या सहाय्याने इतिहास जिवंत केला आहे. अनेक प्रकारची औषधी झाडांची लागवड तिथे केली आहे. त्याचप्रमाणे राशीनुसार झाडे आणि त्यांचे उपयोग अशी एक अनोखी संकल्पना सुद्धा तिथे राबविण्यात आली आहे. साधारण ३ एकर जागेमध्ये एक कोकणी गाव येथे उभारण्यात आला आहे. माफक तिकिट दारामध्ये तेथील स्थानिक गाईडच्या सहाय्याने आपल्याला प्राचीन कोकणबद्दलची इत्यंभूत माहिती मिळते. तिथे सुद्धा खाण्यापिण्याची चंगळ पहायला मिळते ते सुद्धा पारंपारिक पदार्थ म्हणजे अगदी थालीपीठ, अळूवडीपासून मोदकापर्यंत ते गारेगार कोकम, आवळा, जांभूळ सरबताचा आस्वाद घ्यायला मिळतो.

prachin kokan near ganapatipule
prachin kokan near ganapatipule

गणपतीपुळे पासून सुमारे २ कि.मी. अंतरावर मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक देखील पहायला मिळते. त्याबरोबर मत्स्यालय, वॅक्स म्युझियम, मॅजिक मिरर, प्राचिन कोंकण संग्रहालय, जयगड किल्ला, कऱ्हाटेश्वर मंदिर, जय विनायक मंदिर आणि त्याचा अप्रतिम रचनेचा बगीचा परिसर, आरे-वारेचा भव्य अथांग असा समुद्र किनारा हे गणपतीपुळेजवळील इतर आकर्षण स्थळ आहेत.

आत्ता पाहूया गणपतीपुळेला पोहोचायचं कसे | How to reach Ganapatipule

रत्नागिरीहून गणपतीपुळे ४० कि.मी. अंतरावर आहे. गणपतीपुळे येथे जाण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, इत्यादी शहरांतून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने थेट बससेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. रत्नागिरीमधून तर दर अर्ध्या तासाच्या अंतराने गणपतीपुळे आणि लगतच्या परिसरामध्ये जाणार्या बसेस सुरु असतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गेल्यास निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की साधारण ३२ किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे आहे. मुंबई अथवा गोव्यावरून येणाऱ्या लोकांसाठी हा बाहेरील निवली मार्ग अतिशय उत्तम आहे.

ganapatipule coastal road from ratnagiri
ganapatipule coastal road from ratnagiri

मुंबईवरून येणाऱ्या पर्यटकांना रेल्वेने रत्नागिरी स्टेशन पर्यंत येऊन पुढील प्रवास एस.टी. अथवा खाजगी वाहनाने करणे शक्य आहे. आणि अशी अनेक वाहने उपलब्ध सुद्धा असतात. अथवा पूर्वनियोजित एखादे वाहन बुक करून ठेवले तर ते त्याहून योग्य ठरेल. त्याचप्रमाणे आता समुद्रीमार्गे सुद्धा वाहतूक सुरु करण्यात येणार असल्यामुळे गणपतीमुळे आता काही तासांच्या अंतरावर उपलब्ध होऊ शकणार आहे.

गणपतीपुळेची प्रसिद्ध आरती | GANAPTIPULE PRAYER

आरती

आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।
स्वयंभू पश्चिम दिग्विसी । प्रकटला भक्त रक्षणासी ।
सन्मुख सागर समदृष्टी । शोभतो हरित गिरिपृष्टी ।
विराजे सिंदुर सर्वांगा । वाहते सव्य नाभीगंगा ।
वर्णु काय तीर्थ महिमा ऽऽऽ ।
स्थान हे पुलिन, असे जरी विजन, निवासे परम कृपेने पावन ते जाणिले ।
त्रिभूवनी क्षेत्र धन्य झाले । देखता मूर्ती गणेशाची । होईना तृप्ती नयनांची ।
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।
जय जय सुमुख एकदंता । वरदा ऋद्धिसिद्धीकांता ।
जपता द्वादश नामांसी । कामना सिद्धी पदा नेसी।
शोभवी प्रणव रुप वदना । क्षाळितो तीर्थराज चरणां।
अहा ती अस्तसमय शोभाऽऽऽ ।
पूजितो तरणी। स्वर्णमय किरणी । निनदे गगनी । गर्जना मंद अंबुधीची । चालते दिव्य दुंदुभीची ।
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ॥2॥
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला । भक्तगण येत दर्शनाला ।
उगवता धन्य माघमास । लागते रीघ यात्रिकांस ।
सकलजन नारी-नर येती । दर्शने पाप मुक्त होती ।
काय तो यात्रेचा दिवस ऽऽऽ ।
मिळेना वाट, उसळली लाट, स्वारीचा थाट, दाटते गर्दी भाविकांची । पालखी निघे मोरयाची ।
आरती गाऊनी सदभावे । त्रिविक्रम शांतिसुखा पावे ।
आस ही पुरवी दासाची । भक्ती दे अखंड चरणाची ।
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।

रचना – त्रिविक्रम परशराम केळकर, गणपतीपुळे

गणपतीपुळे Ganapatipule येथे राहण्यासाठी मोठ्या संख्येने रिसॉर्ट्स आणि हॉटेल उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे भक्तनिवास, काही होम स्टे सुद्धा आहेत. तसेच राज्य शासनाचे MTDC ची निवास्थान सुद्धा जवळ उपलब्ध आहेत. ऑनलाईन बुकिंगची सुद्धा सोय उपलब्ध आहे. समुद्रकिनारी आता बोट क्लब सुद्धा झाल्याने वॉटर स्पोर्ट्सचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आनंद लुटता येणार आहे. चला तर मग लागा तयारीला.. गणपती बाप्पा मोरया !

RELATED ARTICLES

Most Popular