गणेशोत्सवासाठी प्रत्येक चाकरमानी गावाला जाण्यास उत्सुक असतो. अनेक चाकरमानी दरवर्षी न चुकता गावी गणपती साठी ५ दिवस का होईना, पण येतातच. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अनेक निर्बंध राज्य आणि जिल्हा शासनाने आखून दिले होते. त्यामुळे मागील वर्षी अनेक चाकरमान्यांनी गावी न जाता आहेत तिथेच राहून गणेशोत्सव साजरा करण्यात समाधान मानले. परंतु, या वर्षी मात्र अनेकानी पूर्वीच रिझर्वेशन करून जाण्याची आणि परत येण्याची व्यवस्था करून ठेवली आहे.
कोकण रेल्वेने गणपती साठी कोकणात जाणाऱ्या अधिकच्या गाड्यांची घोषणा केली असता, रिझर्वेशन करण्यासाठी चाकरमान्यांनी उडी घेतली आहे. गणेशोत्सवा निमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या ५ सप्टेंबरपासून सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षण सुरू होताच काही गाड्यांसाठी एका दिवसात रिझर्वेशन फुल होऊन ३०० च्या वर प्रतीक्षा यादीही लागल्याची माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेल्या अधिकच्या ७२ रेल्वे गाड्यासुद्धा लगेचच फुल झाल्या कारणाने, रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांसाठी अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी केली आहे. पुणे येथे दौऱ्यावर असताना आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन, त्या भेटी दरम्यान आशिष शेलार यांनी ही मागणी केली आहे.
राज्य शासनाकडून कोरोना पसरण्याच्या भीतीमुळे वारंवार गणेशोत्सव साध्या घरगुती पध्दतीने साजरा करण्याचे सुचविले जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या अद्यापही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या कोकण रेल्वे प्रशासन कोकणात येणाऱ्या लोकांची कसुन तपासणी करत आहे.