कोल्हापूर टेंबलाईवाडी (ता. करवीर) येथील जुन्या वाहनांची खरेदी, विक्री करणाऱ्यांच्या दोन क्रेटा, एक फॉर्च्यूनर बनावट आरसी आणि टीटी फॉर्मवर बोगस सह्या करून परस्पर विकणाऱ्या सहा जणांच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून ५९ लाख ७० हजार रुपयांच्या तीन कार जप्त केल्या. यातून बनावट कागदपत्रे तयार करून कार विकणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक केलेल्या ६ जणांत एक संशयीत रत्नागिरीचा तर दुसरा चिपळूणचा आहे. याप्रकरणी नीलेश रामचंद्र सुर्वे (वय ३३, रा. खेडी, शिवाजीनगर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), हसन मगदूम जहागीरदार (३१, रा. कारवांचीवाडी, जि. रत्नागिरी), मोहम्मद अमजद मोहम्मद अहसान कुरेशी (४३, रा. मॉडर्नहसनाबाद को-ऑप. सोसायटी, बेहराम बाग, जोगेश्वरी वेस्ट, मुंबई), सकिब सलीम शेख (२९, रा. सलमान मोहल्ला, संजेरी पार्क, ‘बी-विंग’, महापोली, ता. भिवंडी, जि. ठाणे), शहजामा खान बदरुजमा खान (३६, धंदा आरटीओ एजंट, रा. हत्ती खाना, जुना बाजार, जि. बीड), शेख शाहनवाज शेख आसेफ (४५, धंदा फोटो स्टुडिओ मालक, रा. पवनसूत्र मंगल कार्यालय, नगर रोड, जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
संशयित आरोपी नीलेश सुर्वे व हसन जहांगीरदार यांना शाहूपुरी पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यातून ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, टेंबलाईवाडी सुदर्शन कॉलनी येथे सागर हरी देसाई हे गेल्या दहा वर्षांपासून जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे वाहन पार्ककरण्यासाठी जागा नसल्याने न्यू शाहूपुरीतील एका ठिकाणी विक्रीची वाहने पार्क करतात. एप्रिल ते मे २०२४ दरम्यान संजय दत्तात्रय हावलदार (रा. त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर), नीलेश सुर्वे, हसन हे तिघेही देसाई यांची वाहने विकून देत असत. त्यांनी देसाई यांचा विश्वास संपादन केला. तिघांनी ७२ लाख २५ हजारांस तीन कार विकून देतो, असे सांगून देसाई यांच्या मालकीच्या तीन क्रेटा, एक फॉर्च्यूनर, दोन लाख रुपये अॅडव्हान्स देऊन ताब्यात घेतल्या.
चारही वाहने बनावट आरसी बुक तयार करून टीटी फॉर्मवर बोगस सही करून विकल्या. संशयित आरोपीकडून चार मोबाइल, एक पारदर्शक बॉक्स, बनावट आरसीसाठीचे ८७ कोरे पीयूसी कार्ड, ४७ बनावट आरसी, अर्धवट बनवलेले ३१ आरसी बुक, प्रिंटर, सीपीयू, एक मॉनिटर, प्रिंटरही जप्त केला. अटक केलेल्या आरोपींनी आणखी तीन महागड्या कार अशाच प्रकारे परस्पर विकल्याचे तपासात सम ोर आले आहे. त्या तीन कारही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.