गणपती उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात, आनंदाने साजरा केला जातो. गणपती उत्सवाची पूर्व तयारी करण्यासाठी देखील आता कमी अवधी राहिला आहे. वर्षातून एकदा येणारा सण उत्साहाने साजरा करायची सगळ्यांचीच इच्छा असते, परंतु, मागील वर्षापासून येऊन ठेपलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे, घरगुती गणपतींवर सुद्धा मर्यादा आल्या आहेत.
मागील वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने, चाकरमान्यांना गावाच्या घरीसुद्धा जाता आले नव्हते. त्यामुळे गेल्यावर्षी अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करायचा या संदर्भीय बैठक पार पडली. यामध्ये गतवर्षीचीच नियमवाली आणि निर्बंध कायम राहणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गणपती दर्शनासाठी भाविकांना परवानगी दयायची कि नाही याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरीष्ठ पातळीवर घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे गर्दी होणार नाही याची काळजी प्रत्येक सार्वजनिक गणेशमंडळांनी घ्यायची आहे, अशा प्रकारची अट ठेवण्यात आली आहे.
नक्की घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी कोणती नियमावली लागू करण्यात आली आहे, याची माहिती घेऊया थोडक्यात.
घरगुती गणेशमूर्ती २ फूट उंचीची तर सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फूट केली आहे. प्रत्येक गणेश मंडळांनी गर्दी होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. नैसर्गिक गणेश विसर्जणासाठी ८४ ठिकाणे नेमून दिलेली आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे विसर्जन ठिकाणी मूर्ती देण्यात यावी, दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी अनेक दुर्घटना, अपघात घडण्याची शक्यता असते, त्यामुळे असा नियम करण्यात आला आहे.
सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी केवळ १० कार्यकर्त्यांना परवानगी मिळणार. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाला जाऊ नये. मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी कोरोना पार्शभूमीवर गर्दी रोखण्यासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी.