आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे वयाची चाळिशीला पोहोचणे. या वळणावर बरेचशे पुरुष आपल्या खाजगी आयुष्यात स्थिर होताना दिसतात. आर्थिक परिस्थिती सुद्धा सुरुवातीच्या मानाने खूप बदललेली असते. पण अर्ध आयुष्य जागून झालेल असत. सोबतच कौटुंबिक जीवनासाठी देखील हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर पोहोचल्यावर मागे पाहिलं तर आजवरच्या आयुष्यात आपण काय काय घडवले! आणि पुढील आयुष्याच्या असणाऱ्या काही तरतुदी, उपाययोजना असतात, याबाबत अधिक स्पष्टता येते.
मात्र या चाळिशीचा टप्पा पार करत असताना, एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे चाळीशीतील आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत देखील या टप्प्यात अनेक बदल होत असतात. या टप्प्यामध्ये साधारण शारीरिक श्रम करण्याची मानसिकता साधारण कमी होत आलेली असते. कुठेतरी स्थिरता आल्याने, शारीरिक सुरू झालेल्या कुरबुरींकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
चाळीशीमध्ये साधारणत: अनेकांना त्यांच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी, मुलांचे सुरु असणारे शिक्षण, त्यांचे भविष्यातील उच्च शिक्षण, त्याची तरतूद, ऑफिसच्या कामाचा, नातेसंबंध आणि पैशाची चिंता असे अनेक सवाल समोर उभे असतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ४० वर्षांच्या मनाला त्रासदायक ठरू शकतात. पुरुष मंडळी त्यांच्या भावनांना दडपून ठेवतात, त्यांच्या चिंता कोणाला बोलून दाखवत नाहीत. पण अशा व्यक्त न होण्याने त्याचा शरीरावर विपरीत परिणाम व्हायचा तो होतो.
जर चाळिशीपासूनच आरोग्याची योग्य काळजी घ्यायला सुरुवात केली तर, त्याचा फायदा निरोगी वृद्धापकाळ म्हणून होतो. मात्र चाळिशीत आरोग्याकडे केलेलं दुर्लक्ष वाढत्या वयोमानानुसार महागात पडू शकतं. म्हणूनच आज आम्ही आपल्याला चाळिशीत येताना घ्यायच्या काळजीबाबत जाणून घेऊया थोडक्यात.
या वयात तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाशी निगडीत काही, त्वचा विकार, अंग दुखी इत्यादी काही शारीरिक लक्षणे असतील तर त्याचं दर तीन महिन्यांनी चेकअप करणं गरजेचं आहे. परंतु जर याकडे दुर्लक्ष केलं तर हृदयविकार झटकयासारखे, साखरेच्या पातळीची अनियमितता अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी नियमित रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलच्या चाचण्या कराव्या. जर तुमच्या रक्तातून कोलेस्टेरॉलची पातळी उच्च दाखवत असेल, तर त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका संभवू शकतो.
शारीरिक आरोग्या इतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. यासंबंधात तुमचा विश्वास असलेल्या एखाद्या व्यक्तीशी मनमोकळे बोलणे, तसेच गरज असेल तर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणे. मानवी मन हे कायमच कशा ना कशा मध्ये गुंतलेलेच असल्याने ते असुरक्षित असते. पण जर तुम्हाला सर्वांच्यात राहूनसुद्धा खूप एकट वाटत असेल, उदास वाटत असेल, निद्रानाश होत असेल, उदासीन आयुष्य वाटत असेल, वारंवार थकवा जाणवत असेल तर त्याकडे वेळीच गांभिर्यानं पाहणे गरजेचे आहे. त्याकडं मुळीच दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. ही नैराश्याची पहिली पायरी असू शकते आणि त्यावर वेळीच योग्य उपचार असून त्याची माहिती घेऊन ते कृतीत उतरवणे महत्त्वाचे आहे.