कोरोना काळामध्ये पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची लस बनवण्यापासून ते वितरणामध्ये भूमिका लक्षवेधी ठरली. अनेक अडीअडचणी, धमक्या यांच्याशी दोन हाथ करत भारतातील कोरोनावर नियंत्रण मिळविणे हे केवळ लसीकरणामुळे शक्य झाले आहे. जास्तीत जास्त भारतामध्ये लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी इतर देशांमध्ये होणारी निर्यात सुद्धा सिरम इन्स्टिट्यूटने थांबवली होती. आधी देशाचे लसीकरण आणि मगच बाहेरील देश. असे ध्येय लक्षात ठेवूनच सिरम इन्स्टिट्यूटने योग्य दिशेने वाटचाल केली.
रत्नागिरीमधील प्रसिध्द गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत सर्वांगीण विकास, करिअर घडविण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील प्रसन्ना काळे, तेजस निंबरे, बायोटेक्नॉलॉजी विभागातील बास्को बेथेलो, जयवंत सुर्वे, तुषार अंबुरे या पाच पदव्युत्तर विद्यार्थ्यांची जगप्रसिद्ध सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड झाली आहे.
बायोलॉजिकल सायन्स विभागातील ९ विद्यार्थ्यांची यापूर्वीही निवड झाली होती. कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सहकार्यवाह सतिश शेवडे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्याचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सांगितले.
प्लेसमेंट सेल विभागाचे समन्वयक डॉ. रूपेश सावंत, सदस्य डॉ. उमेश सकपाळ, मायक्रोबायोलॉजी विभागाचे डॉ. नितीन पोतदार, बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या प्रा. रश्मी भावे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. भविष्यात अशाच प्रकारचे सुयश महाविद्यालयातील विद्यार्थी प्राप्त करतील असा विश्वास प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. कारण विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये हा काळ अतिशय महत्वाचा असतो. त्यामध्येच योग्य काळामध्ये मार्गदर्शन मिळाले तर, यशाचे उत्तुंग शिखर गाठणे दूर नाही. या यशस्वी विद्यार्थ्यांचे त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.