केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोलवरील अबकारी करात ५ रुपये, तर डिझेलवरील करामध्ये १० रुपये कपात जाहीर केली; पण ही कपात जाहीर होण्यापूर्वीच नियमानुसार तेल कंपन्यांकडे आगाऊ रक्कम भरून या इंधनाचा साठा करावा लागलेल्या पंप चालकांना त्या रात्री अंदाजे साडेतीन लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. अशी परिस्थिती का उद्भवली याचे कारण असे कि, जून २०१७ मध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दैनंदिन किंमत बदलाचे धोरण लागू केले होते.
सरकारतर्फे देण्यात आलेल्या स्पष्टीकरणामध्ये, तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांच्या चढ-उताराचा लाभ ग्राहकांना मिळावा म्हणून असे करण्यात आले होते. पण यामध्ये पंपचालकांनी इंधन खरेदी करण्यासाठी आगाऊ पैसे भरण्याचे धोरण कायम ठेवल्याने अशा प्रकारे पैसे भरल्यानंतर कोणत्याही कारणास्तव दरामध्ये कपात झाली तर त्याचा भुर्दंड पंपचालकांनाच बसणार आहे.
आत्तापर्यंत हा फरक १०-२० पैसे, फार तर आठ आण्यांपर्यंतच होता. पण दिवाळीच्या सुट्टय़ा लक्षात घेऊन गेल्या ३ नोव्हेंबर रोजी पंपचालकांनी रोजच्या पेक्षा जास्त इंधनाची आधीच्या दरानुसारच खरेदी केली आणि त्यानंतर मात्र रात्री केंद्र सरकारने दरामध्ये कपात करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्या दिवशी तेल कंपन्यांकडून विक्री झालेल्या इंधनातील करकपातीचा फटका सरकारला न बसता निव्वळ पंप चालकांना बसला आहे.
देशवासीयांसाठी दिवाळीची भेट म्हणून गाजावाजा झालेल्या पेट्रोल-डिझेल दरकपातीमुळे राज्यभरातील सुमारे साडेसहा हजार पंपचालकांना मात्र एका दिवसात सुमारे दोनशे कोटी रुपयांचा फटका बसल्याचे चित्र पुढे आले आहे. दरातील तफावतीमुळे सीमावर्ती भागातील पेट्रोल-डिझेलची विक्रीही घटली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन फेडरेशन ऑफऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन या पंपचालकांच्या राज्यव्यापी संघटनेतर्फे सर्व सदस्यांकडून गूगल फॉर्मद्वारे याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम सुरु केले आहे.