रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण शुन्याहून पुन्हा वरती चढू लागले आहे. काही दिवसांच्या फरकाने संक्रमित रुग्णसंख्या वाढण्याचा वेग वाढतच चालला आहे. दुसरी लाट आटोक्यात येत असताना अचानक उद्भवलेल्या नव्या विषाणूच्या संकटाने पुन्हा सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन जसे कि मास्क शिवाय फिरणे, सोशल डीस्टन्स न बाळगणे इत्यादी मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे पुन्हा लसीकरण आणि दंडात्मक कारवाईचे धोरण जिल्हा शासनाने कडक केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. तसेच पहिल्या डोसचे लाभार्थी शंभर टक्के पूर्ण करतानाच, दुसर्या डोसची मुदत पूर्ण होऊन गेलेल्यांसाठी विशेष नियोजन करण्यात यावे. मुदत टळून गेलेल्यांची शोध मोहीम हाती घेण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.
पहिला कोरोना प्रतिबंधित डोस झाल्यावर, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने, जनतेने दुसर्या डोस घेण्याबाबत तेवढी गंभीरता दाखवली नाही. त्यामुळे पुन्हा निर्बंध जास्त कडक करून, ज्यांचे दुसरे लसीकरण व्हायचे शिल्लक आहे त्याचा शोध घेऊन, त्यांच्या बद्दल फोनच्या माध्यमाने आरोग्य सेवक माहिती संकलन करत आहेत. आणि त्याची संपूर्ण नोंद ठेवली जात आहे.
कोरोनाचे बाधित दिवसेंदिवस वाढत असून रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा वाढला आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सभापती परशुराम कदम आदी उपस्थित होते.