भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि जागतिक समुद्रकिनारे स्वच्छता दिन औचित्य साधून शनिवारी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये तहसीलदार वराळे यांच्या नेतृत्त्वाखाली गुहागर नगरपंचायत, खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय व रिगल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, सागरी सीमामंच, गुहागर तालुका पत्रकार संघ, आरजीपीपीएल, लायन्स क्लब गुहागर, पर्यटन व हॉटेल व्यावसायिक, प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था, व्याडेश्वर देवस्थान, जीवनश्री प्रतिष्ठान आदी अनेक संस्था संघटना स्वच्छतामोहिमेत सहभागी होणार आहेत.
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पावसाच्या संततधारेमुळे आणि उधाणाच्या भरतीमुळे प्रचंड कचरा जमा झाला आहे. १७ सप्टेंबरच्या स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळावी म्हणून, गेले तीन दिवस गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य व स्वच्छता सभापती प्रसाद बोले आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांसह समुद्रकिनाऱ्यावरील कचरा दूर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या नेतृत्त्वाखाली हे अभियान होणार आहे.
जागतिक समुद्रकिनारे स्वच्छता दिना निमित्त शनिवारी गुहागरकर मानवी साखळी करून समुद्राला राष्ट्रगिताद्वारे मानवंदना देणार आहेत. प्रत्यक्ष कार्यक्रमाचे नियोजना बाबत तहसीलदार वराळे म्हणाल्या, शनिवारी सकाळी ९ वाजता पोलिस परेड मैदानासमोरील समुद्रकिनाऱ्यावर सर्वजण एकत्र जमणार आहेत. अभियानाची सुरुवात सव्वा नऊ वाजता राष्ट्रगीताने करण्यात येईल. त्यानंतर सर्व कर्मचारी प्रतिज्ञा घेऊन सर्वजण मानवी साखळी करून सागराला मानवंदना देतील. ही साखळी २ किमीपेक्षा जास्त अंतराची असेल. त्यानंतर एक तास सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता करतील.
आरजपीपीएल व गुहागर नगरपंचायत तर्फे अभियानासाठी आवश्यक असलेले साहित्य, पाणी आदी व्यवस्था करणार आहे. अभियानानंतरही समुद्रावर गोळा झालेला कचरा उचलण्याची व्यवस्था नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागामार्फत केली जाणार आहे. अभियान संपल्यावर अल्पोपाहाराची व्यवस्था लायन्स क्लब गुहागर आणि सागरी सीमामंच तर्फे करण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष स्वच्छते संबंधीचे नियोजन होमगार्ड तालुका समादेशक कांबळे, गुहागर हायस्कूल, खरे-ढेरे महाविद्यालय आणि रिगल कॉलेजचे शिक्षक करणार आहेत. या अभियानामध्ये गुहागरमधील स्थानिक नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार वराळे यांनी केले आहे. त्यानंतर शहरातील विद्यार्थी आणि नागरिक गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छताही करणार आहेत.