कोकणाला लाभलेल्या समृद्ध समुद्रकिनारपट्टीमुळे अनेक पर्यटक पर्यटनासाठी येथे येतात. वर्षातून एकदा तरी कोकण दर्शन आणि समुद्राची मज्जा अनुभवण्यासाठी ते सहकुटुंब इथे दाखल होतात. काही वेळेला बाहेरून आलेल्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसतो. त्यामुळे खोल समुद्रात जाण्याचा उताविळपणा काही वेळेला अंगाशी येतो. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने, अनेकदा बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात.
यासाठी अशा घटना घडू नये म्हणून अनेक किनारपट्ट्यांवर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रशिक्षण देऊन, पट्टीचे पोहणाऱ्या आणि अनुभव असलेले स्थानिकांचा समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून स्थानिकांना सुद्धा रोजगार मिळेल. नेमणूक तर करण्यात आली पण पगाराचे काय !
गुहागर येथील समुद्रकिनार्यावरील जीवरक्षक गेले पाच महिने पगाराविना आहेत. लांबलचक समुद्रकिनार्यावरील पर्यटकांची सुरक्षा सांभाळणार्या दोन जीवरक्षकांच्या पगारासाठी नगरपंचायतीकडे तरतूद नाही. त्यामुळे गेले पाच महिने पगाराविना काम करणार्या जीवरक्षकांनी ३० डिसेंबरपासून किनार्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेचे काम बंद केले आहे.
गुहागर येथील समुद्रकिनार्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या जीवरक्षकांचा पगार देण्यात न आल्याने जीवरक्षकांनी काम थांबविले आहे. यामुळे आता पर्यटकांची सुद्धा गैरसोय होत आहे. नगरपंचायत प्रशासनाने या जीवरक्षकांचा थकलेला पगार देऊन त्यांना यापुढेही किनार्यावर तैनात ठेवावे, अशा मागणीचे निवेदन गुहागर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुहागर नगरपंचायतीला देण्यात आले. जीवरक्षकांच्या पगाराची वेळीच दखल न घेतल्यास, या कालावधीमध्ये समुद्रात कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी नगरपंचायत जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील किनार्यावर गेली ४ वर्ष नगर पंचायतीतर्फे जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमणूक झाल्यापासून कोणत्याही प्रकारची दुर्घटना गुहागर समुद्र किनारपट्टीदरम्यान घडलेली नाही, जीवरक्षक पूर्णवेळ लक्ष ठेवून आपले काम निष्ठेने करतात. तसेच चिपळूण येथे महापूराची परिस्थिती निर्माण झालेली तेंव्हा मदतीसाठी नगरपंचायतीने या जीवरक्षकांनाच पाठवले होते. त्यामुळे त्यांचे पगार वेळेवर करणे हि पूर्णपणे नगरपंचायतीची जबाबदारी आहे.