26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...

तुकडाबंदी कायदा रद्दमुळे पर्यटन विकासाला चालना

तुकडेबंदीचा कायदा रद्द झाल्याने जमिनीचे तुकडे करून...
HomeRatnagiriहरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प झाला.

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला तालुक्यातील हरचिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेतील नवीन धरण आता पूर्णत्वास आले आहे. ९५ टक्के त्याचे काम झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प झाला. याचे २०२४ मध्ये सुरू झालेले काम विक्रमी वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. ज्यामुळे अनेक वर्षांपासूनची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होणार आहे. १३ कोटी ७ लाख ५८ हजारांचे हे धरणाचे काम आहे. यामुळे १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढणार आहे. तालुक्यातील हरचिरी येथे एमआयडीसीने १९७२ मध्ये एक जुना बंधारा बांधला होता. त्याची साठवण क्षमता ०.२९७ दशलक्ष घनमीटर (MCM) होती. गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी शहर आणि एमआयडीसी परिसरात वाढलेली लोकसंख्या तसेच उद्योगांच्या वाढत्या पाणीवापरामुळे या जुन्या बंधाऱ्यातून मिळणारे पाणी अपुरे पडू लागले. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर बनत होती. ज्यामुळे स्थानिक रहिवासी आणि उद्योजक दोघेही त्रस्त होते.

या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका नव्या आणि मोठ्या बंधाऱ्याची नितांत गरज होती. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी पुढाकार घेतला. त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन बंधाऱ्यांसाठी आवश्यक निधी मंजूर करून घेतला. सामंत यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प वेगाने मार्गी लागला आहे. जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या नवीन बंधाऱ्याची (धरणाची) साठवण क्षमता ०.४५६ दशलक्ष घनमीटर (MCM) आहे. जुन्या बंधाऱ्याच्या ०.२९७ MCM क्षमतेच्या तुलनेत यामध्ये ०.१५९ MCM (दशलक्ष घनमीटर) अधिक पाणी साठवता येणार आहे. याचा अर्थ, पूर्वपिक्षा तब्बल १५९ हजार घनमीटर (१५९ दशलक्ष लिटर) अधिक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यामुळे उद्योगांना मुबलक पाणी मिळेलच; पण शहरानजीकच्या अनेक गावांची पाणीटंचाईची समस्याही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. एमआयडीसीकडूनही होणाऱ्या पाठपुराव्यामुळे कामाने गती घेतली.

शेतीक्षेत्र, वस्तीही नाही होणार बाधित – या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी एकूण १३ कोटी ७ लाख ५८ हजार ६१२ रुपये खर्च अपेक्षित आहे. विशेष बाब म्हणजे, या नवीन बंधाऱ्यामुळे आजूबाजूचे कोणतेही शेतीक्षेत्र किंवा वस्ती बाधित होत नाही, ज्यामुळे स्थानिकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पर्यावरणाची कोणतीही हानी न होता हा प्रकल्प पूर्ण होत असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.

पाच टक्के काम लवकरच पूर्ण – नवीन बंधाऱ्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, उर्वरित ५ टक्के काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर हा बंधारा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येईल. या प्रकल्पामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला असून, जिल्ह्यातील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. पालकमंत्री सामंत यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागल्याबद्दल उद्योजकांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular