कोकणातून थेट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला जोडणारा तालुक्यातील आंबवली- बिरमणी हातलोट घाटाला अर्थसंकल्पात निधी मंजूर करूनही त्या घाटाचे काम रेंगाळलेले आहे. आतापर्यंत त्यावर कोट्यवधीचा निधी खर्ची पडला आहे; मात्र हा घाट सातारा हद्दीपर्यंत बनवण्यासाठी अजून प्रशासनाला २२ कोटी ५० लाखांची प्रतीक्षा आहे. तसेच वनविभागाकडून काही परवानग्या येणे अपेक्षित असल्यामुळे घाटातील रस्त्याचे काम पूर्णतः रेंगाळले आहे. तालुक्यातील आंबवली- बिरमणीमार्गे हातलोट-सातारा या घाटासाठी २००१ मध्ये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. त्यानंतर कामाला प्रारंभ झाला. रस्तेविकास योजनेंतर्गत तयार करण्यात केलेला या घाट रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांना जोडणारा आहे. हा घाट ९.१६० किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी ८.५० किमी लांबी ही रत्नागिरी जिल्ह्यात तर त्यापुढे ०.६६० किमी लांबी सातारा जिल्ह्यात येते.
त्यातील ४.१२५ किमी रस्ता वनविभागाच्या जमिनीतून जातो. त्यामुळे या घाटाच्या कामाला गेल्या अनेक वर्षांपासून खीळ बसली आहे. या घाटासाठी निधी मिळणे आणि वनविभागाच्या परवानगी शिवाय या घाटाचे काम पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेले डोंगर मागे हटवत या ठिकाणी घाटाची निर्मितीही करण्यात आली आहे. बिरमणी गाव २४६ मीटर तर हातलोट ७५२ मीटर इतकी समुद्रसपाटीपासून उंची आहे. या घाटाचे काम सह्याद्रीच्या रांगामध्ये कठीण स्थितीत असल्यामुळे शासनाच्या आलेल्या टप्प्याटप्प्याच्या निधीतून खर्ची करण्यात आले आहे. २०२१ पर्यंत या कामाची वाढीव मुदतअसून, या घाटाला वनविभागाचा अडसर ठरू लागल्यामुळे घाटाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. हा घाट कोकणसह पश्चिम महाराष्ट्रासाठी “माईल स्टोन” ठरणार आहे; परंतु शासनाच्या अनास्थेमुळे हा घाट अर्धवट आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आवाज उठवत होते; पण निधीचे कारण देत राज्य शासनाकडूनच काम रेंगाळलेले आहे.
आणखी निधीची गरज – जेवढा निधी उपलब्ध केला होता तेवढे काम पूर्ण केले आहे. यापुढे हा रस्ता वनविभागाच्या अंतर्गत येत असल्याने संबंधित विभागाच्या परवानगी आणि अन्य कायदेशीर बाबी पूर्ण केल्याशिवाय हे काम सुरू करता येणार नाही तसेच हे काम सुरू करण्यासाठी आणखीन निधीची गरज आहे, अशी माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पर्यायी मार्ग आखणे अवघड – काही ठिकाणी ५० ते ७० मीटर उंचीचे कडे लक्षात घेऊन रस्त्याची आखणी केली आहे. त्या व्यतिरिक्त पर्यायी आखणीची शक्यता धूसर वाटते. सह्याद्रीचा कातळ कोरून तिथे बनवण्यात येणारा घाटरस्ता हे प्रशासनासमोरील तगडे आव्हान आहे. अनेक अडचणींवर मात करत प्रशासनाने घाट बनवण्यास सुरवात केली आहे.
बोगदाही प्रस्तावित – रत्नागिरी व सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवर ४५ मीटर उंचीचा डोंगरकडा असून, त्या ठिकाणी बोगदा प्रस्तावित आहे. हा बोगदा सातारा जिल्ह्याच्या हद्दीत येत असल्याने प्रशासनाकडून रस्त्याचे काम पूर्ण करून ते प्रस्तावित बोगद्यापर्यंत पोहोचविण्याकरिता सद्यःस्थितीत काम केले जात आहे.
असे रूढ झाले घाटाचे नाव – घाटाचा उतार अतिशय तीव्र होता आणि मालाने भरलेली बैलगाडी घेऊन गाडी हाकण्यासाठी अतिशय कठीण होता. त्यामुळे उतरताना भरलेली गाडी हाताने वरती मागे ढकलून धरावी लागे. त्यामुळेच या घाटाला ‘हातलोट घाट’ असे नाव रुढार्थाने पुढे असल्याचे आजही ऐतिहासिक कागदोपत्राद्वारे समजते.