अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये शनिवारी लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी एकूण १७ गंभीर प्रकृतीचे रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी ११ जणांचा होरपळून जागीच मृत्यू ओढवला. तर सोबत अनेकजण होरपळले आहेत. दरम्यान, अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेसंदर्भात आरोग्य विभागाची पाठराखण करत सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी टाकली आहे. आरोग्य विभागाने जून २०२१ मध्येच आग लागलेल्या नवीन इमारतीसाठी आग सुरक्षा प्रतिबंधक सुविधांच्या खर्चासाठी २ कोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तांत्रिक मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे पाठवले होते. मात्र पाठपुरावा करूनही अद्याप त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही, असे सांगत टोपे यांनी राज्यातील सुमारे ५५० सरकारी रुग्णालयांच्या आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली.
यासंदर्भात आरोग्यमंत्री टोपे यांनी पुढे सांगितले कि, आरोग्य विभागासाठी इमारत बांधताना आरोग्य विभागाची जबाबदारी हि निव्वळ निधी देण्यापुरती असते. पुढील सर्व जबाबबदारी ज्यामध्ये इमारतीचे बांधकाम, तेथील सुविधा, आग प्रतिबंधक यंत्रणा याची सर्व जबाबदारी बांधकाम विभागाकडे असते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमध्ये अनेक मागण्या लावून धरल्याचे सांगितले आहे. सरकारी रुग्णालयांच्या राज्यभर अनेक इमारती आहेत, या इमारतींमधील आग प्रतिबंधक सुविधांसाठी जिल्हास्तरावर एक आग प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात यावा, सर्व सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्व प्रशिक्षण देण्यात यावे. सर्व जिल्हा रुग्णालयांत अद्ययावत सीसीटीव्ही स्क्रीनिंग रूमची निर्मिती करून, अंतर्गत व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यात जावी अशा प्रकारच्या भविष्यात अशा दुर्घटना घडू नये यासाठी मागण्या केल्याचे त्यांनी सांगितले.