राज्यात उष्म्याचा कहर व्हायला सुरुवात झाली आहे. मागील दोन वर्ष कोणता ऋतू सूरु आहे हे कळायला मार्ग नव्हता. कारण अवकाळी पाऊस, मधीच हुडहुडी भरणारी थंडी, आणि आता जाणवणारा प्रचंड उष्मा त्यामुळे अंगाची पुरती लाहीलाही होत आहे. आठवड्याभरा पूर्वीपर्यंत गरम पाण्याने आंघोळ करणारे लोक आता थंड पाण्याने आंघोळ करु लागले आहेत, एवढी गरमी वाढली आहे.
फेब्रुवारी महिना सहसा सौम्य थंडीचा असतो, पण यावर्षी तापमान वाढल्याचे दिसून येते. फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमान २८ अंश सेल्सिअस होते, पण काही दिवस दिल्लीसह काही राज्यांमध्ये तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. रत्नागिरी मध्ये देखील आज तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत दिसत होते.
राज्यात १४ ते १६ मार्च या कालावधीत तापमानात वाढ होणार आहे. या तीन दिवसांत जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत.
गेले काही दिवस मुंबई-ठाणे शहरांत पुढील आठवडाभर उष्णतेची लाट उसळणार आहे. शनिवारी अचानक ३८.९ अंशांवर झेपावलेला पारा पाहून मुंबईकरांना दिवस-रात्र घाम फुटणार आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. दुपारच्या उन्हामध्ये अगदी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याने देखील दिला आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातही उष्णतेचा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या शाळा परीक्षा सुरु झाल्याने बाराच्या उन्हात शाळेत येताना किंवा शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलाच उन्हाचा फटका मिळत आहे. त्यामध्ये एसटीच्या संपामुळे लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यंदा मार्चच्या सुरवातीलाच तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने उष्माघाताची लक्षणे सुद्धा घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.