अर्जुना नदीला आलेल्या पुरामध्ये नदीकाठावरील शिळ येथील पावसकरवाडी आणि उन्हाळे येथील मोंडेवाडी या दोन गावांना जोडणारी वीजवाहिनी वाहून गेली होती. तुटलेली वाहिनी जोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील नौका विभागाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सांरग व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पोपट शिंदे या दोघांनी अर्जुना नदी पोहून पारकरत वीजवाहिन्या पलीकडे नेल्या. चार दिवसांपूर्वी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळून त्यामध्ये अर्जुना नदीला पूर आला होता. अर्जुना नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या शिळ, पावसकरवाडी व उन्हाळे मोंडेवाडी या दोन गावांना जोडणारी विद्युतवाहिनी पुराच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली होती.
त्यामुळे दोन्ही गावांतील वीजपुरवठा सुमारे पाच दिवस खंडित होता. वाहिनी जोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नौका विभागाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते. नौका विभागाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सारंग व त्यांचे सहकारी यांनी दोन्ही गावाची पाहणी केली असता अर्जुना नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे आपत्कालीन बोट अर्जुना नदीत उतरवणे धोक्याचे ठरणार होते. त्यामुळे त्यांनी अर्जुना नदी पोहून पार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दोन्ही गावांना जोडणारी विद्युतवाहिनी दोरीला बांधून सारंग व त्यांचे सहकारी शिंदे यांनी अर्जुना नदी पोहून पार करून दोन्ही गावांचा खंडित झालेला विद्युतप्रवाह जोडून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.
यासाठी त्यांना महावितरणचे अभियंता सनी पवार, वायरमन अक्षय भेरे, अभिनंदन सातोसे, लाईनमन मनोज पाटकर यांच्यासह राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील येलके, पोलिस शिपाई सचिन वीर, नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य मिळाले.