ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने अडीच दिवसांत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियासमोर चौथ्या डावात केवळ 19 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या सामन्यातील विजयासह कांगारू संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये प्रत्येकी एक बरोबरीत सुटला आहे. या आधी पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे. ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हा सलग 8वा विजय आहे.
ॲडलेडमध्ये सलग दुसरा पराभव – ॲडलेडमध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. या आधी डिसेंबर 2020 मध्ये ॲडलेडमध्ये टीम इंडियाचा शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर दिवस-रात्र कसोटीत कांगारूंनी जबरदस्त विजय मिळवला होता. ॲडलेडमध्ये पराभवाची मालिका थांबली नाहीये. यावेळीही टीम इंडिया डे-नाईट टेस्टमध्ये जिंकू शकली नाही. या मैदानावर भारताचा शेवटचा विजय डिसेंबर 2018 मध्ये होता.
कसा रंगला सामना? – 157 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 175 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावात भारताला केवळ 18 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून नितीश रेड्डीने 42, ऋषभ पंतने 28, शुभमन गिलने 28 आणि यशस्वी जैस्वालने 24 धावा केल्या.विराट कोहली 11, केएल राहुल 7 आणि रोहित शर्मा 6 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 5, स्कॉट बोलंडने 3 आणि मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या. भारताने दिलेले १९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज गाठले. उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी यांनी मिळून 22 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले. ख्वाजा 12 धावांवर नाबाद राहिला आणि मॅकस्विनी 10 धावांवर नाबाद राहिला.