वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे यांचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनंतर मालदोली खाडीत रविवारी सकाळी सापडला. त्यांची पत्नी अश्विनी अहिरे हिचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी शोधमोहिमेनंतर हाती लागला आहे. रविवारी सकाळी मालदोली येथे नीलेश यांचा मृतदेह सापडला. शहरातील गांधारेश्वर येथील वाशिष्ठी पुलावरून नवदांपत्याने नदीत उडी घेतल्याचा प्रकार ३० जुलैला घडला होता. एनडीआरएफ पथक, पोलिस व अहिरे यांचे नातेवाईक या दोघांचा शोध घेत होते. या शोधमोहिमेत तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी धामणदिवी येथे खाडीकिनारी अश्विनी अहिरे यांचा मृतदेह सापडला. कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर साक्री धुळे येथून अनेक नातेवाईक चिपळुणात दाखल झाले, तेही शोधमोहिमेत सहभागी झाले होते.
त्यासाठी नातेवाइकांनीही स्वतंत्र बोटीची व्यवस्था केली होती. अश्विनी व नीलेश यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला, याविषयी अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिस यंत्रणा या घटनेचा चारही बाजूने तपास व चौकशी करीत आहे. नीलेश अहिरे (मूळगाव साक्री, जि. धुळे) हे शिक्षणासाठी चिपळूणमध्ये आले होते. चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयातून बारावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. याच ठिकाणी आपली मोबाईल शॉपी सुरू केली. या प्रकरणाने त्यांच्या मित्रमंडळालाही धक्का बसला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल, याद्वारे आता चिपळूण पोलिसांकडून या संदर्भात तपास व चौकशी सुरू आहे.
दोन महिन्यांपूर्वी विवाह – वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या अहिरे दापत्याचा विवाह दोन महिन्यांपूर्वी झाला होता. त्यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याचा उलघडा झालेला नाही. पोलिस सर्वांगीण तपास करीत आहेत.