कंगना राणावतचा बहुचर्चित सुरु होणारा शो ‘लॉक अप’ स्ट्रीम होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हैदराबादच्या दिवाणी न्यायालयाने कंगनाच्या शोवर स्थगिती आणली असून, या शोवर कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाने चौकशीच्या आदेशासह शोवर स्टे आणला आहे.
या शो बाबतच्या कॉपीराइट बाबत सनोबर बेग यांनी याचिका दाखल केली आहे. एकता कपूरने लॉक अप नावाने तयार केलेल्या शोचे कॉपीराइट त्यांच्या प्राइड मीडिया कंपनीकडे आहेत, असे या याचिकेत त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, न्यायालयाने एकता कपूरच्या शोचे सर्व व्हिडिओ क्लिप्स, ट्रेलर आणि टीझर रेकॉर्डवर घेतले आणि त्याची तपासणी केली. आणि त्यानंतर न्यायालयाने या शोच्या प्रसारणावर तात्काळ बंदी घालण्यात यावे असे आदेश जारी केले आहेत.
पुढे सांगताना सनोबर बेग म्हणाले, ही कथा शंतनू रे आणि शीर्षक आनंद यांनी लिहिली होती. ७ मार्च २०१८ रोजी कॉपीराईट कायद्यांतर्गत त्याची नोंदणीही करण्यात आलेली होती. पण जेव्हा मी या लॉक अप शोचा प्रोमो पाहिला तेव्हा मी एकदम हादरूनच गेलो. हा शो फक्त आमच्या संकल्पनेशी मिळता जुळता नसून, पूर्णपणे त्याची कॉपी केलेली आहे. अशा प्रकारे पूर्ण जशीच्या तशी कोणी चोरी करू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. कॉपीराइट उल्लंघनाबाबत आम्ही न्यायासाठी दाद मागितली असून न्यायालयाने आम्हाला स्टे ऑर्डर दिली आहे.
आमच्या टीमने या शोच्या संबंधित कंपन्यांना हि संकल्पना पुढे न नेण्याची विनंती केली होती, परंतु, त्यांनी आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. आणि ठरलेल्या वेळेनुसार स्ट्रीम करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत आम्हालाच आव्हान दिले. त्यामुळे अखेर न्यायालयाकडून तोडगा काढण्याशिवाय आमच्याकडे इतर कोणता पर्याय उपलब्ध नव्हता. तरीही जर हा शो प्रसारित करण्यात आला, तर तो न्यायालयाचा अवमान होईल. माझा आपल्या न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की आम्हाला योग्य न्याय मिळेल.