महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून कुणाची नेमणूक करायची असा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यावेळी मीच उद्धव ठाकरे यांचा हात उंचावून मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला होता, असा खुलासा करत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन एनसीबी कारवाई, आयकर विभागाच्या धाडी आणि भाजप नेत्यांच्या आरोपांवर सविस्तर स्पष्टीकरण दिली. यावेळी शरद पवार यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबतच्या विधानावर चांगलेच सडेतोड उत्तर दिले. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच फटकारून, तसंच काही माहिती असेल तर नक्की बोला पण वाटेल ते उगीचच करायचे म्हणून आरोप करू नका, अशी तंबीही पवारांनी फडणवीसांना दिली.
महाविकास आघाडीचे सरकार झाले, तेव्हा हे सरकार बनवण्यासाठी तिन्ही पक्षांचा यामध्ये हात होता. माझाही त्यामध्ये सहभाग होता. त्यावेळी आमदारांची बैठक घेण्यात आली, बैठकीत त्यावेळी मुख्यमंत्री पदी नेतृत्व कुणी करायचं याबाबत तीन चार नाव समोर होती. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांचा हात उंचावून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असे सांगितले.
पण, त्यावेळी उद्धव ठाकरे यांची तेंव्हा हात उंचावण्याची तयारी नव्हती. त्यांची मुख्यमंत्री होण्याची तयारी नव्हती. त्यांना सक्तीने हातवर करावा लागला असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझे वैयक्तिगत मतभेद होते. पण त्यांच्या सारखा दिलदार माणूस जगात शोधून सुद्धा सापडणार नाहीत.
त्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जे योगदान दिले आहे, त्यांच्या सेनेने जे काम केले आहे ते विसरणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा माझा आग्रह होता. माझा आग्रह असल्यामुळे सर्वांनी स्वागत केलं आणि त्याची निवड झाली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी स्वीकारून, कामाला सुरुवात केली. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. कोरोनाच्या अचानक उध्दभवलेल्या संकटातून मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मात करून त्यातून बाहेर काढले. त्यांचे काम उत्तमच आहे, असं कौतुकही पवारांनी केलं.